वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी केविन वॉर्श यांचे नामांकन शुक्रवारी जाहीर केले. विद्यमान प्रशासनाशी कायम खटके उडालेले मावळते अध्यक्ष जेरोम पॉवेल यांची ते जागा घेतील.

पॉवेल यांच्या उत्तराधिकारी म्हणून ट्रम्प यांनी केलेले हे नामांकन असून, त्याला सिनेटची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. तथापि, मध्यवर्ती बँकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या अभूतपूर्व प्रयत्नांचा भाग मानले जात आहे. समाज माध्यमावरील टिप्पणीत ट्रम्प यांनी ‘केविन यांना खूप काळापासून ओळखतो आणि ते फेडरल रिझर्व्हच्या महान अध्यक्षांपैकी एक म्हणून ओळखले जातील,’ असे विधान केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉर्श यांना पुढील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष म्हणून नामांकित केल्यानंतर, शुक्रवारी बाजारात संमिश्र पडसाद उमटले. अमेरिकी डॉलरला मजबूती मिळाली, तर सोने-चांदी व अन्य मूलभूत धातूंचे भाव गडगडले. जगभरातील शेअर बाजारांनीही घसरणीची प्रतिक्रिया दिली. ५५ वर्षीय वॉर्श हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध वित्तीय सल्लागार आणि अर्थतज्ज्ञ आहेत. फेडरल रिझर्व्हमध्ये कामाचा पूर्वानुभव त्यांच्याकडे असून, त्यांनी २००६ ते २०११ या काळात फेडरल रिझर्व्हच्या ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’चे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी या पदावर नियुक्त होणारे ते सर्वात तरुण गव्हर्नर ठरले होते.

व्याजदर कमी न केल्याबद्दल विद्यमान अध्यक्ष पॉवेल आणि फेडरल रिझर्व्ह कायम ट्रम्प यांच्या टीकेची लक्ष्य ठरली आहे. आता त्यांच्याकडून नामांकित वॉर्श हे कमी व्याजदरांना प्राधान्य देणारे मानले जातात. फेडच्या ताळेबंदाचा आकार कमी करून, मोठ्या आर्थिक उत्तेजन योजनांबाबत अधिक सावध भूमिका असणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही ते ओळखले जातात. व्याजदरात मोठी कपात करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी मध्यवर्ती बँकेवर दबाव टाकणे योग्य आहे आणि कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या योगदानातून वाढलेल्या उत्पादकतेची क्षमता फेडने कमी लेखल्याबद्दल वॉर्श यांनी टीकाही केली आहे. वॉर्श हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या हूवर इन्स्टिट्यूशनमधील वकील आणि अर्थशास्त्राचे प्रतिष्ठित अभ्यागत फेलो आहेत. मॉर्गन स्टॅन्ले या गुंतवणूक बँकेतही त्यांनी काम केले आहे.