Donald Trump Cryptocurrency Earnings In 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या चर्चेचे कारण ठरले आहे त्यांनी क्रिप्टोकरन्सीमधून कमावलेले उत्पन्न. अमेरिकेच्या ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट एथिक्सने नुकत्याच जाहीर केलेल्या कागदपत्रांनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या वर्षी त्यांच्या कुटुंबाच्या क्रिप्टोकरन्सी व्यवसायांमधून १.४ अब्ज डॉलर्सहून (सुमारे १२ हजार कोटी रुपये) अधिक उत्पन्न मिळाले आहे. या कागदपत्रांवरून असे दिसून येते की, त्यांना आता त्यांचे बहुतांश उत्पन्न अशा डिजिटल मालमत्तांमधून मिळते, ज्यांना त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतलेल्या निर्णयांचा फायदा झाला आहे.

१९७८ मधील एका कायद्यानुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आणि उपराष्ट्राध्यक्षांना त्यांचे उत्पन्न तसेच मालमत्ता जाहीर करणे बंधनकारक असते. ट्रम्प यांनी सादर केलेल्या नवीन आर्थिक माहितीनुसार, ‘वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल’ या क्रिप्टोकरन्सी उपक्रमामधून त्यांच्या कंपन्यांना जवळपास ८०० दशलक्ष डॉलर्स मिळाले. हा उपक्रम त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी संयुक्तपणे सुरू केला होता.

या कमाईमध्ये क्रिप्टो टोकन्सच्या विक्रीतून मिळालेल्या ५२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचा आणि वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलमधील मालकी हक्कांच्या विक्रीतून मिळालेल्या २५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचा समावेश आहे. तसेच, जानेवारी २०२५ मधील शपथविधीच्या काही तास आधीच बाजारात आणलेल्या आपल्या ट्रम्प मीम कॉइन्सच्या विक्रीतून आणखी ६३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई झाल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उत्पन्नाचा हा तपशील त्यांच्या कमाईत क्रिप्टोमुळे कसा मोठा बदल झाला आहे, हे अधोरेखित करतो. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी जूनमध्ये सादर केलेल्या तपशीलात त्यांनी वर्ल्ड लिबर्टीमधील टोकन विक्रीतून ५७.३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे उत्पन्न दर्शवले होते. मात्र, या वर्षीच्या विवरणपत्रात हा आकडा ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षाही अधिक झाला आहे.

भारतातील व्यावसायिक हितसंबंध

आर्थिक तपशीलांवरून असे दिसून आले की, भारतातून ट्रम्प यांच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत म्हणजे रिअल इस्टेट विकासकांना प्रकल्पांसाठी ‘ट्रम्प’ ब्रँडचा परवाना देणे हा होता. भारतात ‘ट्रम्प’ ब्रँडचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला असून, गुरुग्राम, नोएडा, हैदराबाद, पुणे, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख भारतीय शहरांमध्ये या ब्रँडचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.

राष्ट्राध्यक्ष होताच संपत्तीत प्रचंड वाढ

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर, या क्षेत्रासाठी फायदेशीर ठरू शकणारी धोरणे आणि उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. यामध्ये ‘स्टेबलकॉइन्स’साठी केंद्रीय नियम लागू करणे आणि न्याय विभाग व सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन यांच्याकडून या क्षेत्रावर ठेवल्या जाणाऱ्या कठोर देखरेखीमध्ये शिथिलता आणणे यांचा समावेश होता.

अशा कृतींमुळे त्यांच्यावर वारंवार हितसंबंध जोपासल्याचा आरोप झाला आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार, २०२४ ते २०२६ या काळात त्यांची वैयक्तिक संपत्ती २.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून ६.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत, म्हणजेच जवळपास तिप्पट वाढण्यामागे क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील ट्रम्प यांच्या हालचाली हे मुख्य कारण आहे.