लंडन : इराणशी सुरू असलेल्या संघर्षाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे करत असलेल्या घोषणांच्या आधीच त्या विधानांच्या रोखाने भांडवली बाजारांत कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक आणि नफेखोरी करण्यात आल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे. बाजारातील या सट्टेबाजीकडे ‘इनसायडर ट्रेडिंग’ म्हणून पाहिले जात असल्याने ट्रम्प हे नव्या वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

भांडवली बाजारांवर प्रभाव पाडणाऱ्या गोपनीय माहितीचा बाजारातील गुंतवणुकीतून नफा मिळवण्यासाठी वापर करण्याच्या गैरप्रकाराला ‘इनसायडर ट्रेडिंग’ असे म्हणतात. भांडवली बाजारांचे नियमन करणाऱ्या संस्था, समभाग असलेल्या कंपन्या किंवा राजकारणी यांच्याकडून ‘इनसायडर ट्रेडिंग’ होण्याची शक्यता सर्वाधिक असते. अशा व्यक्ती वा संस्थांकडून मिळालेल्या आगाऊ माहितीचा वापर करून बाजारात सट्टेबाजी होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण संघर्षादरम्यानच्या घोषणांचा आता थेट संबंध या सट्टेबाजीशी लावण्यात येत आहे.

ट्रम्प यांनी केलेल्या घोषणांनंतर भांडवली बाजारांत झालेल्या परिणामांदरम्यान झालेल्या व्यवहारांचा ‘बीबीसी’ने अभ्यास केला. त्यातून हा विशिष्ट पॅटर्न समोर आला आहे. ट्रम्प यांची समाजमाध्यमावरील पोस्ट किंवा दूरचित्रवाणीवरील विधाने येण्याच्या काही तास किंवा कित्येकदा काही मिनिटे आधी व्यवहारांनी उसळी घेतल्याचे दिसून आले.

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर बाजारात होणाऱ्या संभाव्य चढउताराच्या अनुषंगाने हे व्यवहार झाले आणि त्यातून संबंधित गुंतवणूकदारांनी अब्जावधींची कमाई केल्याचे समोर येत आहे. हा ‘इनसायडर ट्रेडिंग’चा प्रकार असून ट्रम्प यांच्याशी संबंधित मंडळींकडून अशा प्रकारची सट्टेबाजी झाल्याचा आरोप केला जात आहे तर, काही गुंतवणूकदार ‘चाणाक्ष’ असून ट्रम्प यांची संभाव्य वक्तव्ये ओळखून ते बाजारात नफा कमवत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तात तर, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आधीही असा पॅटर्न दिसल्याचे म्हटले आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी अनेक देशांवर लादलेल्या आयातशुल्काला स्थगिती दिल्याच्या घोषणेचा संदर्भ दिला आहे. ट्रम्प् यांनी ‘टॅरिफ’च्या घोषणा केल्यापासून कोसळणाऱ्या भांडवली बाजारांनी शुल्कस्थगितीच्या घोषणेनंतर (९ मार्च २०२५) मोठी उसळी घेतली. या घोषणेच्या केवळ १८ मिनिटे आधी अमेरिकेतील शेअर बाजाराचा निर्देशांक वाढणार, या अनुषंगाने कोट्यवधींची गुंतवणूक झाली. ट्रम्प् यांनी प्रत्यक्ष घोषणा केल्यानंतर बाजाराने उसळी घेतली आणि या गुंतवणूकदारांनी अब्जावधींची कमाई केली.

नफेखोरीचा पॅटर्न

९ मार्च : इराण युद्ध सुरू होऊन नऊ दिवस लोटल्यानंतर ट्रम्प यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ‘हा संघर्ष जवळपास संपुष्टात आला आहे’ असे विधान केले. ट्रम्प यांची मुलाखत दूरचित्रवाहिनीवर प्रसिद्ध होण्याच्या तासभरआधी वायदे बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमती घसरण्यावर प्रचंड सौदे लावण्यात आले. आणि मुलाखत प्रसिद्ध होताच तेलाच्या किमती जवळपास २५ टक्क्यांनी घसरल्या.

२३ मार्च: ‘इराणची संस्कृतीच नष्ट करू’ असे विधान केल्याच्या दोन दिवसांतच ट्रम्प यांनी युद्ध संपण्यासाठी इराणशी ‘सकारात्मक चर्चा’ झाल्याचे समाजमाध्यमांतून जाहीर केले. ही पोस्ट प्रसिद्ध होण्याच्या अगदी १५ मिनिटे आधी वायदे बाजारात तेलकिमती घसरण्यावर बोली लागल्या आणि घडलेही तसेच.

सट्टाबाजार जोरात

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘घोषणाबाजी’चा परिणाम प्रत्यक्ष सट्टेबाजारातही दिसून येतो. जागतिक अर्थकारणावर परिणाम करू शकणाऱ्या बातम्यांवर सट्टाबाजार चालवणाऱ्या काही बेटिंग संकेतस्थळांवरही असा पॅटर्न दिसून आला आहे. अमेरिकेने २७ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला करण्याच्या आधी त्या हल्ल्यांच्या अचूक वेळेबद्दल सट्टा लावून १६ जणांनी प्रत्येकी एक लाख डॉलर कमावले. इतकेच नव्हे तर इराणचे खामेनी यांच्या मृत्यूच्या बातमीवर आधीच सट्टा लावून एका व्यक्तीने साडेपाच लाख डॉलरची कमाई केल्याचे वृत्त ‘गार्डियन’ने दिले आहे.