Monster Sundar Pichai Donald Trump Comment: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या वादग्रस्त निर्णय आणि विधानांसाठी जितके ओळखले जातात तितकेच ते आपल्या मिश्किल स्वभावासाठीही ओळखले जातात. त्यांनी आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबाबत केलेली एक मिश्किल टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी सुंदर पिचाई यांचा उल्लेख ‘मॉन्स्टर’ असा करत एका वेगळ्याच प्रकारे कौतुक केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधत असताना ट्रम्प यांनी पिचाई यांच्याकडे वळून विचारले, “सुंदर, तुम्हाला काही बोलायचे आहे का?” यावर पिचाई यांनी बोलायला सुरुवात केली, “सर्वात आधी, धन्यवाद…”, पण ट्रम्प यांनी मध्येच हस्तक्षेप करत सुंदर पिचाई यांची एक अनपेक्षित ओळख करून दिली.

“हा माणूस एक ‘मॉन्स्टर’ (अतिशय शक्तिशाली व्यक्ती) आहे आणि त्याला कोणीच ओळखत नाही. किती छान आयुष्य आहे हे! ‘मॉन्स्टर’ असूनही या सगळ्याची कटकट नाही… तुम्हाला फक्त ‘सुंदर’ हे नाव माहीत असायला हवे! त्याचे नाव सुंदर आहे”, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी केलेली ही मिश्किल टिप्पणी पिचाई यांनी सहजपणे स्वीकारली. ट्रम्प यांच्या ‘मॉन्स्टर’ या टिप्पणीला उत्तर देताना, गुगलच्या सीईओने स्वतःच एक छोटासा विनोद केला.

“आशा आहे की मला ‘मॉन्स्टर’पेक्षा चांगली टॅगलाइन मिळेल!”, असे पिचाई हसत म्हणाले.

ट्रम्प-पिचाई यांच्या या संवादाने सोशल मीडियाचे मोठे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यात ट्रम्प यांनी ‘सुंदर’ या नावाचा केलेला जोरकस उच्चार आणि पिचाई यांचे प्रत्युत्तर हे या संवादाचे मुख्य आकर्षण ठरत आहे.

ट्रम्प, एआय आणि एसआय

माध्यमांशी संवाद साधताना, ट्रम्प म्हणाले की ते एआय कंपन्यांच्या ‘स्व-नियंत्रणा’वर समाधानी आहेत आणि त्यांचे प्रशासन देखरेखीसाठी एआय उद्योगातूनच एक समिती स्थापन करण्याचा विचार करत आहे.

याचबरोबर ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशाद्वारे सरकारला कार्यकारी विभागाच्या सर्व कामकाजात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘एआय’ या संज्ञांच्या जागी ‘सुपर इंटेलिजन्स’ आणि ‘एसआय’ या संज्ञांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘सुपर इंटेलिजन्सच्या युगाची सुरुवात’ असे शीर्षक असलेल्या या आदेशानुसार, अमेरिकन सरकार अधिकृत कामकाजात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ किंवा ‘एआय’ या संज्ञांना मान्यता देणार नाही किंवा त्यांचा वापर करणार नाही.