Donald Trump Net Worth Truth API surge and Truth Social stock price: ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप कॉर्पचा शेअर जूनमधील नीचांकी पातळीवरून जवळपास ४९% नी वधारला आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निव्वळ संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या मते, २६ जून रोजी या शेअरने ६.९६ डॉलर्सचा ५२-आठवड्यांचा नीचांक गाठल्यापासून ट्रम्प यांच्या निव्वळ संपत्तीत ६०० दशलक्ष डॉलर्सची (सुमारे १४ कोटी ४० लाख रुपये) वाढ झाली आहे.
ही वाढ प्रामुख्याने ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपमधील त्यांच्या बहुसंख्य मालकी हक्कामुळे झाली आहे, जो सध्या त्यांच्या डोनाल्ड जे. ट्रम्प रिव्होकेबल ट्रस्टद्वारे सांभाळला जातो. राष्ट्राध्यक्षांचे ज्येष्ठ पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, या शेअर्सचे विश्वस्त म्हणून काम पाहतात आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवतात.
२०२४ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून, शेअर्सच्या प्रमाणातील बदल आणि कॉर्पोरेट घडामोडींमुळे ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपमधील ट्रम्प यांचा हिस्सा सुमारे ५७% वरून ५२% पर्यंत खाली आला आहे. तरीही ते कंपनीचे सर्वात मोठे भागधारक आहेत.
ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे एकूण २७ कोटी ६९ लाख शेअर्स विचारात घेता, ट्रम्प यांच्याकडे सुमारे १४ कोटी ४० लाख शेअर्स आहेत. शेअरच्या सध्याच्या १०.३८ डॉलर्स या ‘क्लोजिंग प्राईस’नुसार त्यांच्या या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे १.४९ अब्ज डॉलर्स इतके आहे. याउलट, २६ जून रोजी ६.९६ डॉलर्स या भावानुसार हे मूल्य १ अब्ज डॉलर्स होते. म्हणजेच त्यांच्या भागधारकीच्या मूल्यात जवळपास ४९२.५ दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे.
१७ जुलै रोजी सुरू झालेल्या ‘ट्रुथ एपीआय’ या रिअल-टाइम डेटा सेवेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सुधारणा झाली. ही सेवा वित्तीय आणि ट्रेडिंग कंपन्यांना प्रमुख ‘ट्रुथ सोशल’ खात्यांवरील पोस्ट्सचा ॲक्सेस देते. ही सेवा, एक बी२बी फीड असून, संस्थात्मक गुंतवणूकदारांना ट्रम्प यांच्या पोस्ट्सचा रिअल-टाइम ॲक्सेस देते. यामुळे ट्रम्प मीडियासाठी एक नवीन डेटा-लायसन्सिंग व्यवसाय निर्माण झाला आहे, तसेच बाजारावर परिणाम करणाऱ्या माहितीचा लवकर ॲक्सेस मिळाल्यास त्यातून मिळणाऱ्या संभाव्य फायद्यांबद्दल चिंताही वाढली आहे.
ट्रुथ एपीआय वर टीका
अँथनी स्कारामुची यांनी ट्रुथ एपीआयवर टीका केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, हे एपीआय ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल पोस्ट्स सर्वात आधी दाखवून हेज फंडांना ट्रेडिंगमध्ये फायदा मिळवून देते, ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे संभाव्य नुकसान होऊ शकते.
राजकीय भाष्यकार एड क्रासेनस्टाईन यांनी ट्रुथ एपीआयला “ट्रम्प कुटुंबाचा उघड भ्रष्टाचार” म्हटले आहे. त्यांच्या मते, किरकोळ गुंतवणूकदारांच्या आधी हेज फंड आणि अल्गोरिथमिक ट्रेडर्स निर्णय घेऊ शकतात.
