e20 fuel petrol ethanol ants myth : पेट्रोलचे वाढते दर आणि उर्जा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोदी सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे प्रमाण हळूहळू वाढवण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच हिरो कंपनीने त्यांची पहिली फ्लेक्स फ्युएल दुचाकी बाजारात सादर केली. तर मारुती सुझुकी कंपनीनेही इथेनॉलवर धावणारी पहिली कार लाँच केली आहे. दरम्यान, इथेनॉल वापरण्यावरुन वाहन चालकांमध्ये अजूनही संभ्रम असल्याचे दिसत आहे. अशावेळी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टने यात आणखी भर टाकली आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल (E20 Fuel) मिक्स केल्यामुळे गाड्यांच्या इंधन टाकीच्या झाकणाजवळ मुंग्या जमा होत आहेत, असा दावा यात करण्यात आला होता. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ‘भारत पेट्रोलियम’ (BPCL) ने यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे.
पेट्रोलमधील इथेनॉलमुळे खरंच मुंग्या आकर्षित होतात का?
इथेनॉल हे ऊसाच्या रसापासून किंवा मळीपासून बनवले जात असल्याने त्यात गोडवा असतो आणि त्यामुळे मुंग्या आकर्षित होतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, बीपीसीएलने स्पष्ट केले आहे की, पेट्रोलमध्ये मिक्स करण्यासाठी करण्यासाठी वापरण्यात येणारे ‘फ्यूएल-ग्रेड इथेनॉल’ हे किण्वन आणि ऊर्ध्वपातन या प्रक्रियांमधून तयार केले जाते. या प्रक्रियेत अंतिम उत्पादनात साखरेचा कोणताही अंश राहत नाही. त्यामुळे या इंधनात मुंग्यांना आकर्षित करेल असा कोणताही गोड पदार्थ नसतो.
कीटक-प्रतिरोधक घटकांचा वापर
इंधन ग्रेड इथेनॉल तयार करताना त्यात विशिष्ट ‘डिपेनॅच्युरंट्स’ म्हणजेच काही रासायनिक घटक मिक्स केले जातात. हे घटक अत्यंत उग्र असतात आणि ते कीटक किंवा मुंग्यांसाठी प्रतिबंधक म्हणून काम करतात. म्हणजेच, या घटकांमुळे मुंग्या जवळ येण्याऐवजी लांब पळतात.
पेट्रोलचा उग्र वास कायम राहतो
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिक्स केल्यानंतरही, पेट्रोलचा स्वतःचा मूळ हायड्रोकार्बनचा उग्र वास हा अत्यंत तीव्र आणि प्रभावी असतो. इथेनॉलचा कोणताही सुवास किंवा वास या पेट्रोलच्या उग्र वासापुढे टिकू शकत नाही. त्यामुळे मुंग्या पेट्रोलच्या तीव्र वासाकडे आकर्षित होणे शक्यच नाही.
कमी बाष्पीभवन
वैज्ञानिक चाचण्यांनुसार, पारंपारिक शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल-मिश्रित पेट्रोलची बाष्प बनण्याची क्षमता खूप कमी असते. त्यामुळे इंधनाच्या टाकीतून बाहेर पडणाऱ्या वाफेचे प्रमाण नगण्य असते. साहजिकच, गाडीच्या फ्युएल कॅपजवळ मुंग्या किंवा इतर कीटकांना आकर्षित करेल असा कोणताही घटक तिथे निर्माण होत नाही.
