E20 Petrol Mileage Impact Old Vehicles Official News: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २० जूनपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. जुन्या वाहनांचे मायलेज आणि इंजिनवर होणाऱ्या परिणामांबाबतच्या शंकांचे निरसन करताना सरकारने आकडेवारीसह आपली भूमिका मांडली.
पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळून तयार केल्या जाणाऱ्या E20 इंधनाबाबत वाहनमालकांकडून काही चिंता व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारने मान्य केले आहे की काही जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये किंचित घट होऊ शकते. तरीही, E20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे नुकसान झाल्याच्या किंवा त्यांचे सुटे भाग खराब झाल्याच्या कोणत्याही घटना समोर आल्या नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
जुण्या वाहनांच्या मायलेजमध्ये ३ ते ५ टक्क्यांनी घट होऊ शकते
राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले की, २०२३ पूर्वीच्या आणि ‘E10’ इंधनावर चालणाऱ्या काही विशिष्ट वाहनांच्या मायलेजमध्ये साधारणपणे ३ ते ५ टक्क्यांनी घट होऊ शकते. त्यांनी नमूद केले की, ही घट साधारणपणे नगण्य स्वरूपाची असते. वाहनाचे मायलेज केवळ वापरल्या जाणाऱ्या इंधनावरच अवलंबून नसते, तर वाहन चालवण्याच्या सवयी आणि वाहनाची देखभाल यांचाही त्यात महत्त्वाचा वाटा असतो.
सरकारच्या मते, वाहन चालवण्याच्या सवयी, वाहनाची वेळेवर सर्व्हिसिंग, टायरमधील हवेचा दाब, व्हील अलाइनमेंट आणि एअर कंडिशनिंगचा वापर यांचाही मायलेजवर परिणाम होतो. सरकार, वाहन उत्पादक आणि काही संस्थांनी स्पष्ट केले आहे की, इंधनाच्या प्रकाराव्यतिरिक्त, हे घटक मायलेजवर मोठा परिणाम करू शकतात.
E20 मुळे नुकसान झाल्याचा पुरावा नाही
मंत्रालयाने सांगितले की, E20 इंधन इंजिनला अधिक स्वच्छ आणि कार्यक्षमतेने चालण्यास मदत करते. यामुळे वाहनातून होणारे उत्सर्जन कमी होण्यासही मदत होते. हे वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधन प्रणाली आणि घटकांशी सुसंगत आहे.सरकारच्या म्हणण्यानुसार, E20 इंधनामुळे वाहनांमध्ये अतिप्रमाणात झीज झाल्याची किंवा इंधनाशी संबंधित भागांमध्ये काही समस्या निर्माण झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
एका प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनीला आपल्या सर्व्हिस डेटाचे विश्लेषण केल्यानंतर असेही आढळले की, नियमित इंधनाचा वापर करणाऱ्या वाहनांच्या तुलनेत E20 इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये बिघाड किंवा नुकसानीचे प्रमाण अधिक नव्हते.
