E20 Petrol Quality Issue affecting engine longevity: देशभरातील पेट्रोप पंपांवर मिळणाऱ्या E20 पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत वाहन उत्पादक कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पेट्रोलच्या नमुन्यांमध्ये क्लोराईडचे उच्च प्रमाण आणि अति-ओलावा (मॉइश्चर) आढळल्यामुळे वाहनांचे सुटे भाग निकामी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला पत्र लिहून, BIS च्या इंधन निकषांमध्ये क्लोराईडच्या प्रमाणाबाबत अनिवार्य मर्यादांचा समावेश करण्याची आणि किरकोळ पेट्रोल पंपांवर तेल कंपन्यांनी गुणवत्तेवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.

देशभरात E20 पेट्रोल लागू करण्यात आले आहे आणि त्यासोबतच इथेनॉलचे अधिक प्रमाण असलेल्या मिश्रणांबाबतच्या भविष्यातील योजनांवर चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर या चिंता व्यक्त केल्या जात आहेत.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या सदस्यांच्या निदर्शनास आले आहे की, इंधन किंवा इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या गॅसशी थेट संपर्कात येणाऱ्या भागांमध्ये जसे की फ्युएल इंजेक्टर्स, फ्युएल पंप्स, ईजीआर वाल्व्ह, एक्झॉस्ट सिस्टिम्स आणि इतर घटक खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

वाहनांचे खराब झालेले भाग तपासले असता, त्यात गंज किंवा झीज दिसून आली आहे. याचे कारण इंधनातील क्लोराईडचे अति प्रमाण आहे. खराब झालेल्या भागांवर साचलेल्या थरांमध्येही क्लोराईड आढळून आले आहे.

वाहनांच्या इंधन टाक्यांमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये क्लोराईडचे प्रमाण ५०० मिग्रॅ/किग्रॅ इतके उच्च असल्याचे आढळले आहे. विविध भागांमधील पेट्रोल पंपांवरून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये क्लोराईडचे प्रमाण ३५० मिग्रॅ/किग्रॅ पर्यंत असल्याचे नोंदवले गेले आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाचे स्पष्टीकरण

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने भेसळीच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, तेल कंपन्यांकडून इंधनाच्या गुणवत्तेवर नियमितपणे देखरेख ठेवली जाते. मंत्रालयाने सांगितले की, ८७,००० हून अधिक पेट्रोल पंपांवर दिवसातून ८-१२ वेळा पाणी शिरल्याची तपासणी केली जात आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, क्लोराईड आणि सल्फाईड भेसळीसाठी २,००० हून अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत देशभरात केवळ क्लोराईड भेसळीची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. या दोन केंद्रांवरील विक्री तात्काळ स्थगित करण्यात आली आहे. मंत्रालयाने सांगितले की, जिथे कुठे भेसळ तिथे कठोर कारवाई केली जाईल आणि तेल कंपन्यांना संपूर्ण इंधन पुरवठा साखळीत भेसळीची तपासणी करण्यासाठी सक्रियपणे सूचना देण्यात आल्या आहेत.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला आपला पाठिंबा कायम ठेवला आहे, तसेच भेसळीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये E20 बद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठी इंधनाच्या गुणवत्तेवर अधिक कठोर नियंत्रण आवश्यक असल्याचे सांगितले आहे.