Egg Price Hike India analysis highlights the growing impact of ethanol production: साखरेचे भाव वाढत असल्याने चिंतेत असलेल्या भारतीयांच्या चिंतेत आता रोजच्या नाश्त्याशी संबंधित एक नवीन बाब समोर आल्यामुळे आणखी भर पडली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वळवला जात असल्याने, या हिवाळ्यात अंड्यांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता कुक्कुटपालन क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गेल्या वर्षभरात भारतात अंड्यांचे भाव जवळपास ४० टक्क्यांनी वाढले आहेत.
नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या (NECC) मते गेल्या वर्षभरात ही वाढ ३५ ते ४० टक्के इतकी झाली आहे. सध्या अंड्यांचे उत्पादन केंद्रावरील दर प्रति अंडे ७ रुपयांच्या आसपास आहेत, तर भारतातील बहुतांश शहरांमध्ये किरकोळ विक्रीचे दर प्रति अंडे ८.५० ते ९ रुपयांच्या दरम्यान आहेत.
नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या मते कुक्कुटपालन खाद्य मोठ्या प्रमाणावर मक्यावर अवलंबून असते, जो एकूण कुक्कुटपालन उत्पादन खर्चाच्या ६५-७० टक्के असतो. भारतातील मक्याच्या पिकाचा वाढता वाटा आता इथेनॉल डिस्टिलरीजकडे जात आहे, ज्यामुळे कुक्कुटपालकांच्या वाट्याला येणारी मका कमी झाली आहे.
एनईसीसीच्या एका अधिकाऱ्याने ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले की, भारताच्या एकूण मका उत्पादनापैकी अंदाजे ३७ टक्के मका आता इथेनॉल डिस्टिलरीज वापरतात.
इथेनॉल निर्मितीवर जोर
हा दबाव भारताच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे निर्माण झाला आहे, ज्याअंतर्गत तेल कंपन्यांना पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे बंधनकारक आहे. ऊस आणि मका या दोन्ही पिकांचा या कार्यक्रमात समावेश होतो आणि मक्याच्या वाढत्या वापरामुळे विशेषतः कुक्कुट खाद्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. संसदेच्या आकडेवारीनुसार, भारताचे एकूण मका उत्पादन सुमारे ४३.४ दशलक्ष टन आहे, त्यापैकी जवळपास १७ दशलक्ष टन आता इथेनॉलसाठी वापरले जाते.
कुक्कुटपालन क्षेत्र भारताच्या मका उत्पादनापैकी सुमारे ६० टक्के वापरते, ज्यामुळे ते या पिकाचे सर्वात मोठे देशांतर्गत वापरकर्ते आहे. इथेनॉल उत्पादकांना आता त्याच मर्यादित पुरवठ्यासाठी कुक्कुटपालकांशी थेट स्पर्धा करावी लागत आहे.
इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही ताण
केवळ अंडीच नव्हे, तर इतरही अनेक गोष्टींमुळे भारतीयांच्या घरगुती बजेटवर ताण येत आहे. २४ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कांद्याच्या किरकोळ किमतीत वार्षिक आधारावर ५९ टक्क्यांनी वाढ होऊन तो ४३.५३ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मागणी आणि पुरवठा यांमधील तफावत दूर करण्यासाठी सरकारने ‘कांदा एक्सप्रेस’ सुरू केली आहे.
गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये गुळाच्या किमतीत सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, सरासरी किरकोळ किंमत ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सणासुदीच्या काळापूर्वी गेल्या महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने, किरकोळ दर २०० रुपये प्रति लिटरच्या वर गेले आहेत.
