Electric Two Wheeler Price Hike : पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. भारतही याला अपवाद राहिला नसून आगामी काळ कठीण असल्याचे संकेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. इंधन दरवाढीच्या भितीमुळे लोक आता इलेक्ट्रीक वाहनांना पसंती देत आहेत. तुम्ही देखील असाच विचार करत असाल तर ही बातमी तुमची चिंता वाढवू शकते. कारण, येणाऱ्या काळात इलेक्ट्रीक बाईक आणि स्कूटर खरेदी करणे महाग होणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचा फटका आता इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्राला बसताना दिसत आहे.

कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढ

बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प आणि एथर एनर्जी यांसारख्या कंपन्यांनी बॅटरी, चिप्स आणि आवश्यक धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचे संकेत दिले आहेत. ईव्ही बॅटरीसाठी लागणारे लिथियम, निकेल आणि कोबाल्ट महाग झाले असून लिथियमची किंमत ८ डॉलर प्रति किलोवरून थेट २४ डॉलरपर्यंत पोहोचली आहे. लिथियम-आयन सेलच्या किमतीत ३० ते ५० टक्क्यांची वाढ झाली असून, ॲल्युमिनियम, तांबे, स्टील आणि प्लास्टिकच्या किमतीही वधारल्या आहेत.

पुरवठा साखळीतील आव्हाने

पश्चिम आशियातील तणावामुळे लिथियम आयन सेल, रेयर अर्थ मॅग्नेट आणि मेमरी चिप्स यांसारख्या महत्त्वाच्या भागांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होत असून, हा बोजा ग्राहकांवर टाकण्याशिवाय कंपन्यांकडे पर्याय उरलेला नाही.

कंपन्यांनी आधीच केलेली दरवाढ

एथर एनर्जी या कंपनीने चालू वर्षात आपल्या वाहनांच्या किमतीत सुमारे ४,००० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तर हिरो मोटोकॉर्प कंपनीने विविध मॉडेल्सच्या किमती २ टक्क्यांनी वाढवल्या असून, ७०० ते ३,५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. स्टील आणि तांब्याच्या किमती वाढल्यामुळे बजाज ऑटोनेही एप्रिल महिन्यापासून दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

मागणी घटणार?

या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत इलेक्ट्रीक स्कूटर आणि बाईकच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. मात्र, आता इलेक्ट्रीन वाहन कंपन्यांनी दरवाढीचे संकेत दिल्याने ही वाढ मंदावू शकते. पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहनांच्या किमती आधीच जास्त असतात. यात आणखी भर पडणार असल्याने मागणीत घट होऊ शकते. सध्या इलेक्ट्रीक दुचाकींवर सरकार १०,००० रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. याशिवाय जीएसटीही केवळ ५ टक्के आकारला जातो. मात्र, त्यानंतरही ही वाहने पेट्रोल वाहनांच्या तुलनेत महागच असतात.

ज्या ग्राहकांना नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचे आहे, त्यांनी सद्यस्थितीतील उपलब्ध स्टॉकचा विचार करून तातडीने निर्णय घेणे हिताचे ठरेल. पुरवठा साखळीतील अनिश्चितता पाहता ही दरवाढ तात्पुरती नसून दीर्घकालीन असू शकते.