Elon Musk College Degree value statement triggers a fresh debate: टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी महाविद्यालयीन शिक्षणाच्या मूल्यावरील वादाला पुन्हा तोंड फोडले आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की ज्ञान आता मुक्तपणे ऑनलाइन माध्यमांद्वारे उपलब्ध असल्याने शिक्षणासाठी पदवीची आवश्यकता राहिली नाही. “शिकण्यासाठी तुम्हाला आता कॉलेजची गरज नाही. सर्व काही मोफत उपलब्ध आहे. तुम्ही तुम्हाला हवे ते मोफत शिकू शकता”, असे एलॉन मस्क यांनी म्हटले आहे.

महाविद्यालयांचे महत्त्व मान्य करताना, मस्क यांनी असा युक्तिवाद केला की, तिथे शिक्षणापेक्षा शिस्त सिद्ध करण्यावरच अधिक भर असतो.

“महाविद्यालयांचे एक मूल्य नक्कीच आहे. ते म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी कठोर परिश्रम घेऊ शकते का आणि ते काम पूर्ण करू शकते का, हे पाहणे. ज्यामध्ये अनेक कंटाळवाण्यया गृहपाठांचा समावेश असतो. मुळात महाविद्यालये ही मौजमजेसाठी आणि तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडता येतात हे सिद्ध करण्यासाठी असतात”, असे त्यांनी नमूद केले.

मस्क यांनी यावर भर दिला की, पदवीधरांच्या शैक्षणिक पदव्यांऐवजी कंपन्यांनी त्यांची निवड करताना त्यांच्यातील असामान्य क्षमतेचा पुरावा शोधला पाहिजे. “जर तुम्ही काहीतरी असामान्य करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्याकडे असामान्य क्षमतेचा पुरावा असायला हवा. महाविद्यालयात जाणे हा मी असामान्य क्षमतेचा पुरावा मानत नाही”, असे ते म्हणाले.

आपला मुद्दा मांडण्यासाठी मस्क यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील अशा अनेक दिग्गजांचा उल्लेख केला ज्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले नव्हते. “बिल गेट्स हे अत्यंत हुशार व्यक्ती आहेत, त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले होते. स्टीव्ह जॉब्स हेही खूप हुशार होते, त्यांनीही शिक्षण अर्धवट सोडले. लॅरी एलिसन हेही हुशार व्यक्ती आहेत, त्यांनीही शिक्षण अर्धवट सोडले”, असा उल्लेख मस्क यांनी केला.

संजीव सान्याल मस्क यांच्याशी सहमत

अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी मस्क यांच्या युक्तिवादाचे समर्थन केले आहे. महाविद्यालयांच्या भूमिकेबाबत आपणही अशाच निष्कर्षापर्यंत आलो असल्याचे त्यांनी म्हटले.

“माझेही मत आता असेच बनले आहे. सर्व प्रकारचे ज्ञान सहज उपलब्ध असताना, केवळ व्याख्यानांवर आधारित शिक्षणासाठी महाविद्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही. १८-१९ वर्षांच्या महत्त्वाकांक्षी तरुणांनी नोकरी सुरू करावी आणि त्यासोबतच पदवीचे शिक्षण पूर्ण करावे. काही क्षेत्रांमध्ये कदाचित पूर्णवेळ प्रत्यक्ष शिक्षणाची गरज भासेल, पण ती अपवाद असतील”, असे ते म्हणाले.