Elon Musk Net Worth updates following the recent SpaceX stock drop details: स्पेसएक्सच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे अवघ्या एका आठवड्याच्या आताच एलॉन मस्क यांची संपत्ती सुमारे १०० अब्ज डॉलर्स कमी झाली आहे. यामुळे त्यांनी जगातील पहिले ‘ट्रिलियनअर’ (एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले व्यक्ती) असण्याचा मान गमावला आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मस्क यांची सध्याची एकूण संपत्ती ९५७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला स्पेसएक्सच्या शेअर बाजारातील दमदार पदार्पणनानंतर मस्क यांनी काही काळासाठी ‘ट्रिलियन-डॉलर’चा टप्पा ओलांडला होता, परंतु त्यांची संपत्ती आता एक ट्रिलियन डॉलर्सच्या खाली आली आहे.
स्पेसएक्सचे मूल्यांकन जवळपास ३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी ट्रिलियनअरच्या यादीत स्थान मिळवले होते. मात्र, आयटी क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणावर झालेली विक्री आणि कंपनीच्या भविष्यातील खर्चाच्या योजनांबाबत निर्माण झालेली चिंता यामुळे या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली.
स्पेसएक्सचे शेअर्स १५० डॉलर्सच्या खाली आले असून, केवळ तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचे ६०० अब्ज डॉलर्सहून अधिक बाजारमूल्य कमी झाले आहे. ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार, या विक्रीच्या काळात मस्क यांना जवळपास ११८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
संपत्तीत घट होऊनही, मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान भक्कमपणे टिकवून आहेत. त्यांची एकूण संपत्ती अजूनही इतर अनेक अब्जाधीशांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा अधिक आहे.
ब्लूमबर्गच्या सध्याच्या अंदाजानुसार मस्क यांची संपत्ती ९५७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. मात्र, फोर्ब्सने त्यांच्या संपत्तीचे मूल्य अजूनही सुमारे १.१ ट्रिलियन डॉलर्स इतके निश्चित केले असून, या यादीतील ते एकमेव ‘ट्रिलियनअर’ आहेत.
स्पेसएक्स ही मस्क यांची सर्वात मोठी मालमत्ता आहे. ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार, या कंपनीतील त्यांच्या हिश्श्याचे मूल्य सुमारे ७४४ अब्ज डॉलर्स आहे, जे त्यांच्या एकूण संपत्तीच्या जवळपास ८० टक्के इतके आहे.
मस्क यांच्याकडे स्पेसएक्सचा सुमारे ३८ टक्के हिस्सा आहे. यामध्ये अब्जावधी शेअर्स आणि स्टॉक ऑप्शन्सचा समावेश आहे. त्याच वेळी, टेस्लामधील त्यांच्या हिश्श्याचे मूल्य सुमारे १५८ अब्ज डॉलर्स इतके आहे.
