Starlink Elon Musk Reliance Jio controversy: एलॉन मस्क यांची सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी स्टारलिंकला भारतात व्यावसायिक कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक मंजुऱ्या मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा “पंतप्रधान अंबानी” असा उल्लेख करत टीका केली होती. आता त्यांच्या या टिकेला रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रत्युत्तर दिले आहे.
रिलायन्सने म्हटले आहे की,की त्यांना स्पर्धेची भीती वाटत नाही. “ग्राहकाला कोण सर्वोत्तम सेवा देतो याची खरी कसोटी म्हणून आम्ही याकडे पाहतो.”
प्रत्येक भारतीय कंपनीप्रमाणेच, रिलायन्सची वाढ अशा भारतात झाली आहे, जी लोकांचे जीवन सुधारणाऱ्या गुंतवणुकीचे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मग ते स्वदेशी असोत किंवा आंतरराष्ट्रीय स्वागत करते. ही मोकळीक कायद्यावर आधारीत आहे. भारत सरकारने स्पष्ट केल्याप्रमाणे, भारतीय असो वा विदेशी, प्रत्येक अर्जदारासाठी समान प्रक्रियाच लागू केली जाते. जिओच्या उपग्रह सेवाही अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
कंपनीने असेही नमूद केले की, रिलायन्समध्ये आम्हाला स्पर्धेची कधीही भीती वाटलेली नाही. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा कोण देतो, याची ही सर्वात खरी कसोटी आहे, असे आम्ही मानतो.
२०१६ मध्ये, जिओने पूर्णपणे नवीन कंपनी म्हणून आणि एकही ग्राहक नसताना भारतातील अत्यंत स्पर्धात्मक दूरसंचार बाजारपेठेत प्रवेश केला होता. अवघ्या दहा वर्षांत, जिओने ५३ कोटींहून अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे आणि भारतीयांना जगातील सर्वोत्तम डिजिटल पायाभूत सुविधांपैकी एक तसेच अत्यंत परवडणाऱ्या दरात डेटा उपलब्ध करून दिला आहे.
आम्ही सॅटेलाईट कम्युनिकेशन क्षेत्रातील स्पर्धेचे स्वागत करतो. जिओसह प्रत्येक कंपनीने भारतातील जनतेला सेवा दिली पाहिजे आणि देशातील कायदे व धोरणांचे पालन केले पाहिजे.
एलॉन मस्क काय म्हणाले होते?
“आदरणीय पंतप्रधान अंबानी, भारताचे खरे मालक तुम्हीच आहात हे माझ्या लक्षात आले नाही, त्याबद्दल कृपया माझी नम्र माफी स्वीकारावी”, अशी पोस्ट एलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात केली होती.
“स्वाभाविकच, तुम्हाला भारतातील महान जनतेचे शोषण करून आपली मक्तेदारी कायम ठेवायला आवडेल, पण तरीही तुम्ही स्टारलिंकला स्पर्धेत उतरण्याची संधी देण्याचा विचार कराल का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
त्यांनी पुढे म्हटले होते, “भारतातील अनेक भागांत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे मुलांना शिक्षणाची संधी मिळत नाही आणि छोट्या व्यावसायिकांना आपली उत्पादने जागतिक बाजारपेठेत विकण्याची संधीही मिळत नाही. स्टारलिंकमुळे त्यांचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे बदलू शकेल.”
