EPF Wage Limit Hike EPFO Salary Limit 25000: केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (EPF) व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, पीएफच्या लाभासाठीची मासिक वेतन मर्यादा १५,००० रुपयांवरून २५,००० रुपयांपर्यंत वाढवली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत होईल, तसेच सरकार या योजनेवर दरवर्षी अंदाजे ११,३३९ कोटी रुपये खर्च करेल.
सरकारने भविष्य निर्वाह निधीसाठी (PF) वेतन मर्यादा वाढवली आहे. याचा पूर्वीपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होईल, विशेषतः ज्यांचे वेतन १५,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना पूर्वी या लाभाच्या कक्षेतून वगळण्यात आले होते.
यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीत असताना त्यांच्या भविष्यासाठी नियमितपणे बचत करण्याची संधी मिळेल. याव्यतिरिक्त, कंपन्यांना अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक सामाजिक सुरक्षा लाभ देणे बंधनकारक असेल. या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी सरकार दरवर्षी अंदाजे ११,३३९ कोटी रुपये खर्च करेल.
ईपीएफओच्या वेतन मर्यादेत यापूर्वी सप्टेंबर २०१४ मध्ये बदल करण्यात आला होता. तेव्हा ती १५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. यापूर्वी, २००४ ते २०१४ या काळात या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
सरकारने म्हटले आहे की, हे नवीन बदल गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण वेतनवाढ, वाढते उत्पन्न आणि औपचारिक रोजगाराच्या विस्ताराचे प्रतिबिंब आहे.
ईपीएफओ सध्या कर्मचारी भविष्य निधी, कर्मचारी निवृत्तीवेतन योजना आणि कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजनेचे काम पाहते. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, या संस्थेचे सुमारे ७.६८ लाख योगदान देणाऱ्या आस्थापनांमध्ये अंदाजे ७.९८ कोटी योगदान देणारे सदस्य आहेत, तर ईपीएस अंदाजे ८२ लाख निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाचे लाभ प्रदान करते.
