EPFO Inoperative Account Interest Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. जर तुमचे पीएफ खाते ‘इनऑपरेटिव्ह’ (निष्क्रिय) झाल्यास शिल्लक रक्कमेवर भविष्यात मिळणारे व्याज बंद होऊ शकते. व्याजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पात्र सदस्यांनी वेळेत आपली जमा रक्कम काढून घ्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. ईपीएफओने आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवरून #InoperativeEPFAccount या हॅशटॅगसह पोस्ट शेअर करत कर्मचाऱ्यांना या नियमांची आठवण करून दिली आहे. यामध्ये कोणत्या परिस्थितीत तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते, याचीही माहिती दिली आहे.

निष्क्रिय खाते म्हणजे काय?

  • ईपीएफओच्या नियमांनुसार, जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी सोडतो किंवा निवृत्त होतो आणि त्याच्या पीएफ खात्यात कोणतेही नवीन योगदान जमा होत नाही, तेव्हा असे खाते निष्क्रिय श्रेणीत जाते.
  • ईपीएफओनुसार निवृत्तीचे वय ५८ वर्ष आहे, अशा परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याने यापूर्वीच नोकरी सोडली किंवा निवृत्ती घेतली तर त्याने वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत पीएफ खात्यातील सर्व रक्कम काढून घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्यानंतर मिळणारे व्याज बंद होईल.
  • ५५ व्या वर्षी किंवा त्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या (३६ महिने) आत आपली रक्कम काढून घ्यावी, जेणेकरून व्याजाचे नुकसान होणार नाही.

पीएफ खात्यातील बचत सुरक्षित ठेवण्यासाठी ५ महत्त्वाचे नियम

  1. आपल्या ‘युनिव्हर्सल अकाउंट नंबर’चा वापर करून पीएफ खात्यातील शिल्लक नियमित तपासावी.
  2. आपले आधार, बँक खाते आणि पॅन कार्डची माहिती पीएफ खात्याशी अद्ययावत ठेवावी.
  3. नवीन नोकरीत रुजू झाल्यावर जुन्या पीएफ खात्यातील रक्कम नवीन खात्यात हस्तांतरित करावी, ती तशीच सोडू नये.
  4. निवृत्तीनंतर ईपीएफओने ठरवून दिलेल्या कालावधीत आपली हक्काची रक्कम काढून घ्यावी.
  5. ईपीएफओच्या वेळोवेळी येणाऱ्या नियमांची आणि मार्गदर्शक तत्त्वांची माहिती ठेवावी.

पीएफचे पैसे कोणत्या परिस्थितीत काढावे?

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही खासगी श्रेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी भारत सरकारची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा व सेवानिवृत्ती बचत योजना आहे. याचे नियमन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) करते.
  • या योजनेमध्ये कर्मचारी आणि कंपनी (नियोक्ता) दरमहा ठरावीक रक्कम जमा करतात, ज्यावर सरकारकडून निश्चित व्याज मिळते. पीरएफचे (EPF) पैसे प्रामुख्याने निवृत्तीनंतर, नोकरी सुटल्यास किंवा बेरोजगार असताना, किंवा वैद्यकीय आणीबाणी, घर खरेदी/बांधकाम व उच्च शिक्षणासारख्या विशिष्ट गरजांसाठी काढावेत.
  • या निधीचा वापर कधीही हौस किंवा अनावश्यक खर्चासाठी करू नये असे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात येते. कारण, निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा आधार हाच निधी असतो.