EPFO Official WhatsApp Channel: कर्मचारी भविष्य निधी संघटनेने म्हणजेच ईपीएफओने (EPFO) आपल्या सदस्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना महत्त्वाचे अपडेट्स मिळवणे सोपे व्हावे यासाठी एक अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू केले आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे ईपीओफओने याची घोषणा केली.
ईपीओफओने ही पोस्ट शेअर करताना नमूद केले, “ईपीएफओ आता व्हॉट्सॲपवरही! महत्त्वाचे अपडेट्स आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी ईपीएफओच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी व्हा.”
ईपीएफओने एक थेट लिंक देखील शेअर केली आहे, ज्याद्वारे कोणीही चॅनलमध्ये सहभागी होऊ शकतो. चॅनलमध्ये सहभागी झाल्यानंतर, कोणालाही ईपीएफओकडून थेट अपडेट्स मिळू शकतील. तुम्ही लिंकवर क्लिक केल्यावर, जर तुम्ही पीसीवर असाल तर एक वेगळी विंडो दिसेल. जर तुम्ही मोबाईल फोन वापरत असाल, तर ती लिंक तुम्हाला थेट व्हॉट्सॲपवर घेऊन जाईल.
या निर्णयासह ईपीएफओ सदस्यांना भविष्य निर्वाह निधी सेवांशी संबंधित घडामोडींची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी आणखी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
ईपीएफओने एक व्हिडिओ आणि QR प्रसिद्ध केला आहे, ज्याद्वारे युजर्स त्यांच्या व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होऊ शकतात. या चॅनेलच्या माध्यमातून सदस्यांना ईपीएफओकडून थेट महत्त्वाच्या बदलांची माहिती मिळेल. यामध्ये ईपीएफओच्या सेवांशी संबंधित माहिती तसेच सदस्य आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आवश्यक असलेल्या इतर घडामोडींचा समावेश असेल.
ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर थेट ईपीएफओशी संबंधित अपडेट्स मिळवण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. हा संवाद स्थानिक आणि प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल, जेणेकरून सदस्य त्यांच्या पसंतीच्या भाषेत अधिक सोयीस्करपणे संवाद साधू शकतील.\
पण, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ईपीएफओच्या घोषणेमध्ये असे म्हटलेले नाही की, सदस्य त्यांच्या वैयक्तिक पीएफ खात्याचा तपशील थेट पाहण्यासाठी, पीएफ शिल्लक रक्कम तपासण्यासाठी किंवा पीएफची रक्कम काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी या व्हॉट्सॲप चॅनेलचा वापर करू शकतात. ईपीएफओने जाहीर केलेली ही सेवा म्हणजे एक ‘व्हॉट्सॲप माहिती चॅनेल’ आहे.
