EPFO PF Interest Credited : देशभरातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांच्या खात्यात आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे पीएफचे व्याज आज जमा करण्यात आले आहे. ईपीएफओने (EPFO) सुमारे ३४ कोटी सभासदांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली आहे. बहुतेक खातेदारांना एसएमएसद्वारे (SMS) ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, तुम्हाला असा संदेश आला नसेल तर काळजी करू नका. चार सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईलवरुन तुमचा बॅलन्स चेक करू शकता.
ईपीएफओ पासबुक लाइट
ईपीएफओच्या अधिकृत सदस्यांसाठी ईपीएफओने पासबुक पोर्टलवर ‘Passbook Lite’ ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या (EPFO) अधिकृत मेंबर पासबुक पोर्टलला भेट द्यावी लागेल. इथे तुमचा १२ अंकी UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग-इन करा. तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) सबमिट करा. ‘View’ वर क्लिक करा आणि ‘Passbook Lite’ पर्याय निवडा. येथे तुम्हाला तुमचे ताजे योगदान, काढलेले पैसे आणि एकूण शिल्लक व्याजासह दिसेल.
तुमचे तर UAN ॲक्टिव्हेट असेल तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून एक एसएमएस पाठवून शिल्लक तपासू शकता. यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये ‘EPFOHO UAN’ असे टाईप करा (येथे UAN च्या जागी तुमचा स्वतःचा १२ अंकी नंबर टाका). जर तुम्हाला हा मेसेज तुमच्या प्रादेशिक भाषेत म्हणजेच मराठीत हवा असेल, तर UAN नंबरच्या पुढे ‘MAR’ हा कोड जोडा. (उदा. EPFOHO 123456789012 MAR) हा मेसेज ७७३८२९९८९९ (7738299899) या क्रमांकावर पाठवा. तुम्हाला तात्काळ शेवटचे योगदान, एकूण बॅलन्स आणि केवायसी स्थितीचा मेसेज येईल.
उमंग ॲपवर पीएफ बॅलन्स
स्मार्टफोन युजर्स गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ‘UMANG’ ॲप डाउनलोड करू शकतात. ॲपमध्ये लॉग-इन करून तुमचा UAN नंबर लिंक करा. लिंक केल्यानंतर तुम्ही सहज पीएफ बॅलन्स पाहू शकता. यातून पैसे काढण्याचीही सुविधा मिळते. या ॲपवर गेल्या ३ महिन्यांच्या पेन्शन व्यवहारांची संक्षिप्त माहिती मिळते आणि संपूर्ण पासबुक पीडीएफ (PDF) स्वरूपात डाउनलोड करता येते.
सदस्य आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ (011-22901406) या क्रमांकावर मिस कॉल देऊनही आपला पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकतात. या नंबरवर कॉल केल्यानंतर एक रिंग वाजल्यानंतर कट होतो. त्यानंतर काही मिनिटांत तुमच्या मोबाईल नंबर एसएमएसद्वारे माहिती पाठवली जाते.
व्याज जमा होण्यास उशीर झाल्यास नुकसान होईल का?
अनेकदा तांत्रिक कारणांमुळे काही सदस्यांच्या खात्यात व्याज उशिरा जमा होते. परंतु, यामुळे ईपीएफओ सदस्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही. ईपीएफओ सध्या ८.२५% व्याजदर देत असून सध्याच्या घडीला सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणारी अशी कोणतीही योजना नाही.
