How to Check PF Balance Online : तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल आणि तुमच्याही पगारातून पीएफ कट होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांच्या खात्यात आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे पीएफचे व्याज बुधवार (१५ जुलै २०२६) पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ईपीएफओ (EPFO) लवकरच सुमारे ३४ कोटी सभासदांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करेल, असे संकेत केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच दिले होते. तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले का? हे तुम्ही मोबाईलवरुन ४ सोप्या पद्धतीने शोधू शकता.

१. ‘पासबुक लाईट’द्वारे ऑनलाईन तपासणी

ईपीएफओच्या अधिकृत सदस्यांसाठी ईपीएफओने पासबुक पोर्टलवर ‘Passbook Lite’ ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी तुम्हाला खालील सोप्या स्टेप फोलो कराव्या लागतील.

  • स्टेप : ईपीएफओच्या (EPFO) अधिकृत मेंबर पासबुक पोर्टलला भेट द्या.
  • स्टेप : तुमचा १२ अंकी UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग-इन करा.
  • स्टेप : तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) सबमिट करा.
  • स्टेप : ‘View’ वर क्लिक करा आणि ‘Passbook Lite’ पर्याय निवडा. येथे तुम्हाला तुमचे ताजे योगदान, काढलेले पैसे आणि एकूण शिल्लक व्याजासह दिसेल.

२. केवळ एक ‘SMS’ पाठवून

  • ज्या सदस्यांचे UAN ॲक्टिव्हेट आहे, ते आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून एक एसएमएस पाठवून बॅलन्स जाणून घेऊ शकतात. यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये ‘EPFOHO UAN’ असे टाईप करा (येथे UAN च्या जागी तुमचा स्वतःचा १२ अंकी नंबर टाका).
  • जर तुम्हाला हा मेसेज तुमच्या प्रादेशिक भाषेत म्हणजेच मराठीत हवा असेल, तर UAN नंबरच्या पुढे ‘MAR’ हा कोड जोडा. (उदा. EPFOHO 123456789012 MAR)
  • हा मेसेज ७७३८२९९८९९ (7738299899) या क्रमांकावर पाठवा. तुम्हाला तात्काळ शेवटचे योगदान, एकूण बॅलन्स आणि केवायसी स्थितीचा मेसेज येईल.

३. ‘उमंग’ (UMANG) ॲपचा वापर

  • स्मार्टफोन युजर्स गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ‘UMANG’ ॲप डाउनलोड करू शकतात.
  • ॲपमध्ये लॉग-इन करून तुमचा UAN नंबर लिंक करा.
  • लिंक केल्यानंतर तुम्ही सहज पीएफ बॅलन्स पाहू शकता, योगदानाचा मागोवा घेऊ शकता आणि क्लेम देखील करू शकता. या ॲपवर गेल्या ३ महिन्यांच्या पेन्शन व्यवहारांची संक्षिप्त माहिती मिळते आणि संपूर्ण पासबुक पीडीएफ (PDF) स्वरूपात डाउनलोड करता येते.

४. मिस कॉल सेवा

सदस्य आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ (011-22901406) या क्रमांकावर मिस कॉल देऊनही आपला पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकतात.

PF चे व्याज जमा होण्यास उशीर झाल्यास नुकसान होईल का?

अनेकदा तांत्रिक कारणांमुळे काही सदस्यांच्या खात्यात व्याज उशिरा जमा होते. परंतु, यामुळे ईपीएफओ सदस्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही. ईपीएफओ सध्या ८.२५% व्याजदर देत असून सध्याच्या घडीला सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणारी अशी कोणतीही योजना नाही. तुम्हाला जर तुमच्या बॅलन्सविषयी काही तक्रार असेल तर तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार करू शकता.