EPFO UPI Withdrawal Scheme : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठी आता लांबलचक आणि वेळखाऊ प्रक्रिया संपणार नाही. ईपीएफओ लवकरच यूपीआयद्वारे पीएफ खात्यातून पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याची तयारी करत आहे. सध्या बँकांसोबत याची चाचणी सुरू आहे.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, डिसेंबरच्या अखेरपर्यंत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. या नवीन बदलामुळे सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच पीएफसंदर्भात ३ मोठ्या गोष्टी सदस्यांना माहिती असणे आवश्यक आहे.

१. यूपीआयद्वारे (UPI) थेट पैसे काढण्याची सुविधा

प्रस्तावित सुविधेनुसार, ईपीएफओ युनिव्हर्सल अकाऊंट नंबर पोर्टल सदस्यांच्या यूपीआय खात्यांशी जोडण्याची योजना आखत आहे. सध्या सदस्यांना युएएन पोर्टलवर ऑनलाइन क्लेम करावा लागतो. त्यानंतर ईपीएफओची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पैसे बँक खात्यात जमा होतात. मात्र, नवीन सुविधेमुळे थेट यूपीआयच्या माध्यमातून पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

२. पैसे काढण्यावर असणार मर्यादा

या सुविधेअंतर्गत सदस्य त्यांच्या पात्र शिल्लक रकमेच्या ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढू शकतील. सध्याच्या नियमांनुसार पीएफ खात्यात किमान २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवावी लागते. शिक्षण, लग्न आणि घर यांसारख्या अल्पकालीन गरजांसाठी ही पात्रता लागू असेल. विशेष म्हणजे, खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमेवर करमुक्त व्याज मिळत राहील.

३. पीएफ वेतन मर्यादेत वाढ

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या वेज सीलिंगमध्ये मोठी वाढ केली आहे. वेज सीलिंग म्हणजे पीएफ योगदानाची गणना करण्यासाठी निश्चित केलेली मूळ पगाराची कमाल मर्यादा. ही मर्यादा पूर्वी १५,००० रुपये होती, जी आता वाढवून २५,००० रुपये करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, या बदलामुळे आणखी ५१ लाख कर्मचारी अनिवार्य पीएफ कवरेजच्या कक्षेत येणार आहेत.

४. तुमच्या पीएफ खात्यात जास्त पैसे जमा होतील

तुमचा पगार १५,००० पेक्षा जास्त असला, तरी पीएफ नियमांनुसार तुमच्या पगारातून १२ टक्के म्हणजेच १,८०० रुपये कापले जातात. तेवढेच (१,८०० रुपये) तुमची कंपनीही तुमच्या पीएफ खात्यात टाकते. आता २५,००० रुपयांवर १२ टक्के पीएफ मोजला जाईल. म्हणजेच तुमच्या पगारातून दरमहा ३,००० रुपये कापले जातील आणि कंपनीही ३,००० रुपये देईल. म्हणजेच दरमहा १२०० रुपयांची अतिरिक्त कपात होऊन वार्षिक १४,४०० रुपयांची भर पडेल.

हातातील पगार थोडा कमी होईल

पीएफसाठी तुमच्या पगारातून आधीपेक्षा १,२०० रुपये जास्त कापले जातील. त्यामुळे दरमहा बँकेत जमा होणारा पगार काही प्रमाणात कमी होईल.