CNG, Hybrid, EV Salesः इराण युद्धामुळे इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याचा वेगळाच परिणाम देशातील वाहन विक्रीच्या आकड्यांमध्ये दिसू लागला आहे. इलेक्ट्रिक, हायब्रीड आणि सीएनजी अशा जीवाश्म इंधनाला पर्यायी वाहनांना ग्राहकांची पसंती वाढू लागली आहे. जून महिन्यातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत याचे दिसून आलेले चित्र म्हणजे, पर्यायी इंधन वाहनांचा एकूण विक्रीतील वाटा पहिल्यांदाच ४०.३५ टक्क्यांवर पोहोचला.
भारतात कार, दुचाकी, व्यावसायिक वाहने (ट्रक, बस) आणि ट्रॅक्टर विकणाऱ्या १५,००० पेक्षा जास्त वाहन वितरकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन’ने सोमवारी जून महिन्यातील ग्राहक मागणीची आकडेवारी जाहीर केली. इराण युद्धामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली. यामुळे असोसिएशनच्या मते, ग्राहकांकडून पर्यायी इंधन वाहनांना मागणी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्तातील इंधन पर्यायांकडे ग्राहक वळत आहेत. प्रवासी वाहनांच्या विक्रीत मेमध्ये पर्यायी इंधन वाहनांचे प्रमाण ३८ टक्के होते. जून महिन्यात त्यात वाढ होऊन ते ४०.३५ टक्क्यांवर पोहोचले. ग्राहकांची ही तात्कालिक प्रतिक्रिया आहे की भविष्यातही ही वाढ कायम राहील, यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल, असे असोसिएशनचे अध्यक्ष सी.विघ्नेश्वर यांनी सांगितले.
देशातील एकूण वाहन विक्री जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २१.८ टक्के वाढीसह २६ लाख इतकी झाली. यात प्रवासी वाहनांची विक्री ही गेल्या वर्षीच्या तुलनेत २८.६ टक्क्यांनी वाढून ती ४ लाख १० हजार ८५३ वर पोहोचली आहे. या विक्रीत सीएनजी वाहने २४.३ टक्के, हायब्रीड ८.३ टक्के तर इलेक्ट्रिक वाहने ७.८ टक्के अशी हिस्सेदारी राहिली. जूनमध्ये दुचाकी विक्री वार्षिक तुलनेत २१.२२ टक्क्यांनी वाढून १८ लाख २८ हजार ४५८ वर गेली. उल्लेखनीय म्हणजे देशातील एकूण दुचाकी विक्रीत इलेक्ट्रिक दुचाकींचे प्रमाण प्रथमच १०.६ टक्क्यांवर पोहोचले आहे, असे असोसिएशनने नमूद केले आहे. दरम्यान, देशातील आघाडीची प्रवासी वाहन निर्मिती कंपनी मारूती सुझुकीने इंधन दरवाढीमुळे गेल्या महिन्यात सीएनजी मोटारींच्या मागणीत ४० टक्के वाढ नोंदविली गेल्याचे म्हटले होते.
किमती खालावू शकतील?
इराण युद्धामुळे पुरवठा साखळीतील विस्कळीतपणा आणि इंधन दरवाढ या गोष्टींचा परिणाम हळूहळू कमी होणार आहे. मात्र, यासाठी काही तिमाहींचा कालावधी लागू शकेल. त्यातून आगामी काळात किमती खालावणारा परिणाम होण्याची शक्यता आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष सी.विघ्नेश्वर यांनी संकेत दिले.
