EV Penetration: मे महिन्यांत चार वेळा केल्या गेलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीवर ग्राहकांनी उतारा शोधून काढल्याचा, या महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) विक्रीचा वाढलेला टक्का दर्शवतो. मे महिन्यांत विक्रमी पावणे तीन लाखांहून अधिक ईव्ही मोटारी विकल्या गेल्या आणि एकूण वाहन विक्रीत त्यांची हिस्सेदारी प्रथमच ११ टक्क्यांच्या ऐतिहासिक पातळीवर गेली.
देशातील एकूण वाहन विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात ९.५५ टक्के वाढ नोंदविण्यात आली. याचवेळी एकूण वाहन विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण प्रथमच ११ टक्क्यांवर पोहोचले. पश्चिम आशियातील युद्धाच्या परिणामी झालेल्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचा कल ईव्हीकडे वळल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने (फाडा) विक्रीची अधिकृत आकडेवारी जाहीर करताना म्हटले आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात एकूण वाहन विक्री २३ लाख १० हजार ४५१ होती. यंदा मेमध्ये ही विक्री २५ लाख ३१ हजार ६७ झाली आहे. वाणिज्य वाहने, प्रवासी वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. एकूण दुचाकींच्या विक्रीत इलेक्ट्रिक दुचाकींचे प्रमाण गेल्या वर्षी मेमध्ये ६.११ टक्के होते. ते आता ९.२३ टक्क्यांवर पोहोचले आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे.
सरलेल्या मे महिन्यात ४ लाख २ हजार ५९१ प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात ती ३ लाख २६ हजार ६५६ होती. म्हणजेच त्यात यंदा २३.२५ टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या महिन्यात दुचाकींची विक्री ७.५४ टक्क्यांनी वाढून १८ लाख ४४ हजार ९४७ झाली. मे २०२५ मध्ये ती १७ लाख १५ हजार ५८१ होती. तीनचाकी वाहनांची विक्री ३.५६ टक्क्यांनी वाढून १ लाख ११ हजार ५२६ झाली. वाणिज्य वाहनांची विक्री ५.२९ टक्क्यांनी वाढून ८३ हजार ८२३ झाली आहे, असे असोसिएशनने नमूद केले आहे.
मे मधील उच्चांक, एप्रिलच्या तुलनेत घसरण
सरासरीपेक्षा जास्त तीव्र उन्हाळा, इंधनाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील बदलणारी स्थिती या सर्व घटकांचा परिणाम मेमधील देशातील वाहन विक्रीवर झाला. आतापर्यंतची मे महिन्यातील सर्वाधिक उच्चांकी वाहन विक्री यंदा नोंदविण्यात आली आहे. मात्र, एप्रिलच्या तुलनेत त्यात ६.७५ टक्के घसरण झाली आहे, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर यांनी नमूद केले.
