FCNR B Deposits overview: अनिवासी भारतीयांच्या विदेशी चलनातील ठेवी अर्थात ‘एफसीएनआर(बी)’ ठेवींच्या ओघामुळे कर्ज वितरणात अनियमितता येईल, ही भीती निराधार आहे. हा ठेवींचा ओघ चार महिन्यात बँकांकडून वापरलेला दिसेल, अशी माहिती स्टेट बँकेचे अध्यक्ष सी.एस.शेट्टी यांनी नुकतीच दिली.
रिझर्व्ह बँकेने अनिवासी भारतीयांच्या विदेशी चलनातील ठेवींसाठी बँकांवरील व्याजदराची मर्यादा शिथिल केली होती. ही विशेष सुविधा काही काळ सुरू होती. या अंतर्गत बँकांनी देशातील १२७ अब्ज डॉलरच्या ठेवी मिळविल्या. देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँकेचे नेतृत्व शेट्टी करीत आहेत. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलताना ते म्हणाले की, बँकांकडे मोठ्या प्रमाणात ठेवी आल्या म्हणून त्यांच्या कर्ज वितरणात अनियमितता येणार नाही. बँका अधिक जबाबदारीने काम करतील. पुढील तीन ते चार महिन्यांत या ठेवींचा कर्ज वितरणासाठी वापर झालेला दिसेल. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक ऑक्टोबरमध्ये होणार असून, त्यात व्याजदर वाढ होण्याची शक्यता दिसत नाही.
दरम्यान, ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलताना अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी अमिताभ चौधरी यांनी ‘एफसीएनआर(बी)’ ठेवींमुळे कर्ज वितरणात अनियमितता येऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे.
बँकांकडून एआयच्या वापरावर भर
भारतीय बँकांकडून कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि मशिन लर्निंग साधनांचा वापर अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्टेट बँकेने ग्राहक सेवा आणि काही कर्ज उत्पादनांसाठी तंत्रज्ञानाचा वापर सर्वांत आधी केला. आता एजंटिक एआयचा वापर बँकांनी करायला हवा. यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याची गरज आहे. सुरूवातीला एजंटिक एआयसाठीचा खर्च जास्त असेल. मात्र, त्याचा व्यापक पातळीवर वापर सुरू झाल्यावर हा खर्च कमी होत जाईल, असे सी.एस.शेट्टी यांनी नमूद केले.
