Financial crime compliance jobs Pune vs Mumbai: बँकिग, वित्तीय सेवा व विमा परिसंस्थेत आर्थिक गुन्हे नियमनाची अधिकाधिक आवश्यकता भासू लागली असून, यातून २०३० पर्यंत प्रशिक्षित मनुष्यबळासाठी १९ हजार रोजगार निर्माण होतील, असा अंदाज एनएलबी सर्व्हिसेस या तंत्रज्ञान सल्लागार संस्थेने नुकताच वर्तविला आहे.

याविषयी एनएलबी सर्व्हिसेसचे मुख्याधिकारी वरूण सचदेवा म्हणाले की, कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायदा, केवायसी, दहशतवादी अर्थसाह्य प्रतिबंध, निर्बंध अशा प्रकारच्या नियामक गोष्टी आणि व्यवहारांवरील देखरेख यावर देशातील वित्तीय संस्थांकडून अधिकाधिक भर दिला जात आहे. यासाठीची यंत्रणा भक्कम केली जात आहे. त्यामुळे देशातील आर्थिक गुन्हे नियमनासाठीचे मनुष्यबळ २०३० पर्यंत ४५ हजारांपर्यंत जाणार आहे. त्यात विशेषज्ज्ञांचे १९ हजार रोजगार निर्माण होतील.

सध्या वित्तीय क्षेत्रात दाखल होणारे मनुष्यबळ आर्थिक गुन्हे नियमनात फारसे कुशल नाही. केवळ ४० टक्के नवीन व्यावसायिक याबाबत तज्ज्ञता असलेले आहेत. त्यात आर्थिक गुन्ह्यांचा तपास, निर्बंधांची तपासणी, गैरव्यवहारांचे विश्लेषण, नियामकांकडे अहवाल सादर करणे आणि आर्थिक गुन्हे तंत्रज्ञान मंच यांचा समावेश आहे.

बँकिंग, वित्तीय सेवा व विमा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची कमतरता २०३० पर्यंत २० टक्क्यांपर्यंत खाली येईल. याच कालावधीत जागतिक क्षमता केंद्रांकडून (जीसीसी) २५ टक्के भरती केली जाईल. कारण बहुराष्ट्रीय बँकांकडून जीसीसीच्या माध्यमातून भारतात वित्तीय गुप्तचर विभाग, स्तर दोन व तीन तपासणी आणि आर्थिक गुन्ह्यांचे विश्लेषण ही कामे केली जातात, असे सचदेवा यांनी सांगितले.

देशात बंगळुरू आघाडीवर

देशात आर्थिक गुन्हे नियमनासाठीच्या कुशल मनुष्यबळात बंगळुरू ३२ टक्क्यांसह आघाडीवर आहे. त्यानंतर हैदराबाद १६ टक्के, पुणे १३ टक्के, गुरूग्राम ११ टक्के, त्या उलट देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत त्याचे प्रमाण केवळ १० टक्के असे आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत या क्षेत्रातील सुमारे २५ टक्के मनुष्यबळ भरती ही अहमदाबाद, जयपूर, कोची, कोईमतूर आणि भुवनेश्वर यासारखी उदयोन्मुख शहरांतून होईल, असे सचदेवा यांनी नमूद केले.