Finland Expert Arto Sivonen India Experience and cultural reflection: जगातील अत्यंत शिस्तप्रिय आणि समानतेला महत्त्व देणाऱ्या देशांमध्ये राहिल्यानंतर, फिनलंडचे इम्पॅक्ट स्ट्रॅटेजिस्ट आर्तो सिवोनेन यांनी भारतातील त्यांच्या अनुभवांबद्दल महत्त्वाचे निरीक्षण मांडले आहे. भारताने आपल्याला असे अनेक धडे दिले, जे फिनलंडमध्ये कधीच शिकायला मिळाले नसते, असे ते म्हणाले. हेलसिंकी शहराच्या शांत वातावरणाची आणि बंगळुरूच्या गजबजलेल्या सामाजिक जीवनाची तुलना करत त्यांनी भारतीय संस्कृतीचे कौतुक केले.
‘कॉमन ग्राऊंड’चे सह-संस्थापक आणि फिनलंडमधील आल्तो विद्यापीठाचे प्राध्यापक असलेल्या सिवोनेन यांनी दक्षिण कोरिया, केनिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या अनेक देशांमध्ये काम केले आहे. त्यानंतर ते बंगळुरूमध्ये स्थायिक झाले. “भारत ही अशी जागा आहे, जिथे मला सर्वाधिक आणि सर्वात वेगाने शिकायला मिळेल याची मला खात्री होती”, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
सिवोनेन यांच्या मते, फिनलंडमध्ये लोक एकमेकांपासून काहीसे अंतर राखून राहतात, कमी बोलतात आणि प्रयव्हसीला अधिक महत्त्व देतात. दुसरीकडे भारतीयांमध्ये शेजाऱ्यांमधील आपुलकी, सामाजिक जवळीक आणि कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढण्याची ‘जुगाड’ वृत्ती दिसते.
येथे अनेकदा अनोळखी व्यक्तीलाही ‘काका’ किंवा ‘काकू’ म्हणून हाक मारली जाते आणि एकमेकांशी सहजपणे वागले जाते. या सततच्या गजबजाटामुळे त्यांना पहिल्यांदाच स्वतःसाठी शांत आणि वैयक्तिक जागेची गरज जाणवली. मात्र, याच गजबजलेल्या आणि मोकळ्या सामाजिक वातावरणामुळे माणसाला एकटेपणा जाणवत नाही आणि आपलेपणाची भावना निर्माण होते. त्यांच्या मते, ही भावना फिनलंडमध्ये तुलनेने कमी अनुभवायला मिळते.
“भारतातील एक गोष्ट जी मला खूप आवडते आणि जी फिनलंडमध्ये नाही, ती म्हणजे लोकांचा एकमेकांसोबत राहण्याचा आणि एकमेकांना मदत करण्याचा स्वभाव व त्यांची जीवनशैली. इथे मी नेहमीच इतरांशी मिळून-मिसळून मार्ग काढू शकतो. लोकांचे सोशल स्किल्स अप्रतिम आहेत. मग त्या पार्ट्या असोत किंवा अनोळखी लोकांशी गप्पा मारणे असो. फिनलंडमध्ये तुम्ही लोकांना टाळू शकता, त्यामुळे तिथे असे करण्याची गरज पडत नाही. जेव्हा मी फिनलंडला परत जाते, तेव्हा मला या गोष्टीची खरोखरच खूप आठवण येते”, असेही आर्तो सिवोनेन यांनी शेवटी नमूद केले.
