Flipkart Festive Season Job Creation : एकीकडे देशात बेरोजगारी वाढत असल्याची चर्चा असतानाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टने आगामी सणासुदीच्या काळात तब्बल अडीच लाख लोकांना रोजगार देणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचा समावेश आहे. वॉलमार्टच्या मालकीच्या या कंपनीने जाहीर केले आहे की, यामध्ये गिग वर्कर्सचा मोठा समावेश असून, यामुळे देशातील विविध भागांत रोजगाराचे नवे मार्ग खुले होतील.

पहिल्यांदाच नोकरीत येणाऱ्यांना प्राधान्य

विशेष म्हणजे फ्लिपकार्ट एकूण रोजगारांपैकी जवळपास ७५,००० संधी फ्रेशर्सला देणार आहेत. यामुळे देशातील विविध भागातील तरुणांना मुख्य प्रवाहात येण्याची नवी संधी मिळणार आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने आपल्या पुरवठा साखळीचा विस्तार केला आहे.

  • ७,००० हून अधिक ईकार्ट (Ekart) सुविधा : यामध्ये फुलफिलमेंट सेंटर, सॉर्टिंग हब्स आणि लास्ट-माईल डिलिव्हरी ऑपरेशन्सचा समावेश आहे.
  • ९०० नवीन फेस्टिव्ह डिलिव्हरी हब्स : कंपनीने आपल्या नेटवर्कमध्ये ९०० हून अधिक नवीन हब्स जोडले आहेत.
  • लास्ट-माईल ऑपरेशन्स : नव्या रोजगारांपैकी ६० टक्के वाटा हा लास्ट-माईल संधींचा आहे. ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’चा विस्तार आणि टियर २ व टियर ३ शहरांमधील वाढती मागणी यामुळे हे शक्य झाले आहे.

महिला आणि दिव्यांगांना समान संधी

फ्लिपकार्टच्या या विस्तारामुळे महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगाराचे प्रमाण वाढले आहे. सध्या महिलांचा पुरवठा साखळीतील सहभाग २० टक्क्यांहून अधिक झाला आहे, तर गोदाम आणि डिलिव्हरी ऑपरेशन्समध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सहभागातही वाढ झाली आहे. फ्लिपकार्ट ग्रुपचे मुख्य कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजनीश कुमार यांनी सांगितले की, “डिजिटल कॉमर्सच्या वाढीसह ऐतिहासिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांना औपचारिक अर्थव्यवस्थेत सामावून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तर फ्लिपकार्ट ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष ) हेमंत बद्ररी म्हणाले, “या वर्षी आम्ही ‘बिग बिलियन डेज’पूर्वी ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आमचे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर वाढवत आहोत.”

अमेझॉनचीही जोरदार तयारी

क्विक-कॉमर्स क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्या जसे की ब्लिंकइत, झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्ट यांच्याकडून वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दुसरीकडे, अमेझॉन इंडियाने देखील सणासुदीच्या हंगामासाठी देशभरात १ लाख ६० हजारहून अधिक हंगामी रोजगार संधी निर्माण केल्याची घोषणा केली आहे. यामध्ये वाराणसी, कोची, रांची आणि गोरखपूरसह ४०० हून अधिक शहरांमधील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकऱ्यांचा समावेश आहे.