नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी पारंपरिक हलवा समारंभात भाग घेतला, ज्याद्वारे १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर होणाऱ्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीच्या अंतिम टप्प्याची सुरुवात झाली.केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या कर्तव्य भवन-१ येथील नवीन इमारतीत छपाई यंत्रणा नसल्याने, नॉर्थ ब्लॉक या जुन्या ठिकाणीच तळघरात हा पारंपरिक समारंभ योजण्यात आला.
या निमित्ताने पारंपरिक गोड पदार्थ तयार करून अर्थसंकल्पाच्या तयारीमध्ये सहभागी असलेल्या अर्थमंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तो दिला जातो. हलवा समारंभानंतर अर्थसंकल्पाच्या तयारीमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना बाह्य जगाशी संपर्क तोडून, त्यांना कुलुपबंद केले जाते, असे अर्थमंत्रालयाने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे.
या समारंभाचा एक भाग म्हणून, अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प छपाई विभागाला भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला, तसेच संपूर्ण अर्थसंकल्पीय संघाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि अर्थ मंत्रालयांतर्गत सर्व विभागांचे सचिव आणि अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
७.६ टक्क्यांचा विकासदर
देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर हा आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा कायम अधिक राहिला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पापूर्वीच्या पाहणी अहवालात अंदाजलेल्या ६.३-६.८ टक्के विकासदरापेक्षा यंदा बाह्य प्रतिकूलतेतही विकासवेग ७.६ टक्के राहण्याची आशा आहे.
सीतारामन यांचा सलग नववा अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी सलग नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामुळे सीतारामन माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी वेगवेगळ्या कालावधीत सादर केलेल्या १० अर्थसंकल्पांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचतील. देसाई यांनी १९५९-१९६४ या काळात अर्थमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात एकूण सहा अर्थसंकल्प आणि १९६७-१९६९ दरम्यान चार अर्थसंकल्प सादर केले होते.
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात अनुक्रमे नऊ आणि आठ अर्थसंकल्प सादर केले आहेत. मात्र, सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सलगपणे सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम कायम ठेवतील. वर्ष २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा निर्णायक विजय मिळवल्यावर, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २०२४ मध्ये मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतरही सीतारामन यांच्याकडील अर्थमंत्रिपद कायम आहे. आतापर्यंत त्यांनी फेब्रुवारी २०२४ मधील अंतरिम अर्थसंकल्पासह एकूण आठ सलग अर्थसंकल्प सादर केले आहेत.
अर्थसंकल्प मोबाइल ॲपवर मागील पाच अर्थसंकल्पाप्रमाणेच, २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प देखील कागदविरहित स्वरूपात सादर केला जाईल. सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तऐवज, खासदारांना आणि सामान्य जनतेला डिजिटल पद्धतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल ॲप’वर (युनियन बजेट मोबाइल ॲप) उपलब्ध होतील. हे ॲप द्विभाषिक (इंग्रजी आणि हिंदी) असून ते अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही मंचावर उपलब्ध असेल. रविवारी संसदेत अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर, अर्थसंकल्पीय दस्तऐवज मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध होतील.
