Price Hike In August impact on daily essentials and cars in India: पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या मालाच्या अस्थिर किमती आणि वाढलेले मालवाहतूक दर, तसेच चलनातील चढ-उतार यांचा फटका बसल्याने, ग्राहक वस्तू उत्पादक कंपन्या ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे चालू वर्षातील विविध श्रेणींमधील ही तिसरी दरवाढ ठरणार आहे.

पुढील महिन्यापासून पॅकबंद चहा, केसांचे तेल, रेफ्रिजरेटर्स, टेलिव्हिजन, कपडे आणि प्रवासी वाहने यांसारख्या विविध उत्पादनांच्या किमतीत ६ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वीची ही दरवाढीची शेवटची फेरी असेल आणि त्यामुळे मागणीवर फारसा परिणाम होणार नाही, अशी कंपन्यांना अपेक्षा आहे. केरळमधील ओणम सणाने (ऑगस्टमध्ये) सणासुदीच्या काळातील खरेदीला सुरुवात होते आणि नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत ही खरेदी उच्चांकावर असते.

“पश्चिम आशियातील तणाव निवळल्याने परिस्थिती स्थिरावेल अशी आम्हाला अपेक्षा होती”, असे हायर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश एन. एस. म्हणाले. “मात्र, अलीकडेच वाढलेल्या तणावामुळे पुन्हा एकदा किमती वाढवणे भाग पडेल. कारण चलन विनिमय दरांमधील अस्थिरता कायम आहे, तसेच कच्चा माल आणि कच्च्या तेलावर आधारित उत्पादनांचे दरही उच्च पातळीवर आहेत. आतापर्यंत उद्योगाने वाढीव खर्चाचा संपूर्ण बोजा ग्राहकांवर टाकलेला नाही, परंतु आता तो टाकला जाईल.”

भारतात कॅल्विन क्लेन आणि टॉमी हिलफिगरची विक्री करणाऱ्या अरविंद फॅशन्सनेही किंमतींमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमीशा जैन यांनी गेल्या आठवड्यात विश्लेषकांना सांगितले की, पश्चिम आशियातील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नफा टिकवण्यासाठी कंपनी सक्रिय पावले उचलत आहे, ज्यात खर्चावर अधिक कडक नियंत्रण आणि संभाव्य किंमत बदलांचा समावेश आहे.

कमी किमतीत खरेदी केलेला जुना साठा विकून कपड्यांच्या ब्रँड्सनी आतापर्यंत किमतीत मोठी वाढ करणे टाळले होते. मात्र, आता जास्त किमतीत खरेदी केलेला नवीन हंगामातील माल दुकानांमध्ये पोहोचत असल्याने किमती वाढवणे अपरिहार्य झाले आहे.

मारुती सुझुकीच्या कारही महागणार

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी ऑगस्टपासून आपल्या गाड्यांच्या किमतीत ३०,००० रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी केलेली ही या आर्थिक वर्षातील दुसरी दरवाढ असेल. होंडा कार्स इंडियादेखील १ ऑगस्टपासून किमती वाढवणार आहे, तर रुपयाच्या घसरणीचा परिणाम भरून काढण्यासाठी मर्सिडीज-बेंझ इंडिया पुढील तिमाहीत दरवाढ करण्याच्या विचारात आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच किमती वाढवल्या होत्या.