Ford Employee Fired Cookie Theft Controversy: फोर्ड या जगप्रसिद्ध वाहन निर्मात्या कंपनीने एक नवा वाद ओढावून घेतला आहे. कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने दावा केला आहे की, १.९५ डॉलर्स (१८६ रुपये) किमतीची कुकी चोरल्याच्या आरोपावरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
या कर्मचाऱ्याचे नाव कर्ट क्रॉम असे असून त्यांचे वय ६० वर्षे आहे. ते गेल्या ११ वर्षांपासून अमेरिकेतील केंटकीमधील लुईव्हिल येथे असलेल्या फोर्डच्या ट्रक कारखान्यात कार्यरत होते. त्यांनी सांगितले की, आठवड्याला सरासरी ६० तास काम करत असूनही, त्यांची निष्ठा आणि समर्पण दुर्लक्षित करून एका खोट्या आरोपावरून कामावरून काढून टाकण्यात आले.
कर्ट क्रॉम यांनी पुढे नमूद केले की, त्यांना कंपनीकडून दोन लाख डॉलर (१.९ कोटी रुपये) पगार मिळायचा आणि गेल्या वर्षी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये अंदाजे १२ डॉलर (१.१४ लाख रुपये) खर्च केले होते.
“गेल्या वर्षी मला २ लाख डॉलरपेक्षा जास्त पगार मिळाला होता. मी चोरी का करू? गेल्या वर्षी मी कॅन्टीनमध्ये १२०० डॉलर खर्च केले होते. यातील सर्वाधिक खर्च डायट कोकवर झाला होता”, असे क्रॉम यांनी शिफ्टिंग गियर्स या संकेतस्थळाला सांगितले.
“मी विचार करत होतो, फोर्ड मोटरमधील माझ्या कारकिर्दीचा शेवट असा होणार का? आता परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आधी मला ‘चोर’ ठरवले आणि मी चोरी केली नाही असे म्हटल्यावर मला ‘खोटारडा’ ठरवले. मी चोरी केली आहे, याबद्दल त्यांना इतका ठाम विश्वास होता. जेव्हा मी माझ्या बँक खात्याचं स्टेटमेंट पाहिलं, तेव्हा ते १.९५ डॉलर तिथे चक्क जमा झालेले दिसले,” असे क्रॉम यांनी सांगितले.
यानंतर, क्रॉम यांनी फोर्ड आणि युनियनच्या प्रतिनिधीला कुकीजच्या खरेदीसाठी डेबिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटचे स्क्रीनशॉट्स पाठवले. दोन आठवड्यांनंतर युनियनने त्यांना कळवण्यात आले की, फोर्डला बँकेचे स्टेटमेंट नोटरी करून हवे होते.
पुन्हा नोकरी स्वीकारण्याची ऑफर नाकारली
युनियनने क्रॉम यांना सांगितले की, पेमेंट किओस्क ऑपरेटर ‘अरामार्क’ने १२ जून रोजी ‘फोर्ड’ला त्यांनी कुकीजसाठी केलेले पेमेंट त्यांचेच असल्याची पुष्टी केली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याची ऑफर देण्यात आली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तोवर क्रॉम यांनी घराच्या जवळच अधिक चांगली नोकरी स्वीकारली होती.
