मुंबई : सामान्य गुंतवणुकदारांच्या मानसिक कणखरतेची परीक्षा घेणाऱ्या सरलेल्या मार्च महिन्याने आणखी एका गंभीर मुद्द्याला पटलावर आणले. या महिन्यांत परदेशी गुंतवणुकदारांच्या माघारीच्या तीव्रतेसह, त्यांच्या बँकिंग समभागांचा विक्रीचा विक्रम नोंदवला गेला. ज्यामुळे शेअर बाजाराच्या घसरणीची व्याप्ती वाढवलीच, शिवाय डॉलरपुढे रुपयाच्या शरणागतीचाही परिणाम साधला.

इराण युद्धाचे परिणाम हे अर्थव्यवस्थेच्या वाढीला आणि पर्यायाने कंपन्यांच्या नफ्याला मोठे नुकसान पोहचवणारे ठरतील अशी भीती वाढली असून, त्यातूनच परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) तुफान विक्री करून काढता पाय घेत आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी’च्या (एनएसडीएल) आकडेवारीनुसार, एफपीआयनी मार्च महिन्यात ६०,६५५ कोटीं रुपयांची विक्री केवळ बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांमध्ये केली. ही आतापर्यंतची विक्रमी विक्री असून, भारतीय बाजारांतून महिनाभरात काढून घेण्यात आलेल्या सुमारे १.१८ लाख कोटी रुपयांपैकी (१२.६६ अब्ज डॉलर) निम्म्याहून अधिक गुंतवणुकीचा उपसा केवळ या क्षेत्रातून झाला आहे.

खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आणि वित्तीय सेवा संस्थांचे समभाग मार्चमध्ये १५.५ टक्के ते २० टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे ‘निफ्टी’ हा प्रमुख निर्देशांक ११.३ टक्क्यांनी गडगडला आणि गेल्या सहा वर्षांतील निर्देशांकाची ही सर्वात वाईट मासिक कामगिरी ठरली. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचा समभाग मार्च महिन्यात सर्वाधिक १७.६ टक्क्यांनी घसरला; अध्यक्षांनीच बँकेच्या कारभाराबाबत संशयाला जागा निर्माण करणारे राजीनामा पत्र देऊन, अचानक पदत्याग केल्यामुळे ही घसरण दुणावल्याचे दिसून आले.

विश्लेषकांच्या मते, २७ मार्च रोजी मध्यवर्ती बँकेने परकीय चलन व्यवहारांवरील गुंतवणुकीच्या मर्यादा कठोर करण्याचा निर्णय घेतला, जो बँकांसाठी संभाव्य आर्थिक नुकसानीचा ठरण्याची भीती निर्माण झाली आणि त्यामुळेही परकीय माघारीची तीव्रता वाढली. ‘एनएसडीएल’च्या आकडेवारीनुसार, मार्चअखेर समाप्त आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये, भारतीय बाजारांमधील एफपीआयच्या विक्रीने १.८३ लाख कोटी रुपयांच्या (१९.६९ अब्ज डॉलर) विक्रमी उच्चांक गाठला.

देशी गुंतवणूकदारांचाही आखडता हात

परकीय गुंतवणुकीच्या अस्थिर प्रवाहामुळे बाजारात निर्माण होणारे धक्के पचवून बाजाराला सावरण्याचे काम आतापर्यंत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (डीआयआय) करत आले आहेत. मात्र, ‘सीएलएसए’च्या विश्लेषकांच्या गटानुसार, सलग १८ महिने एकहाती किल्ला लढवल्यानंतर, आता डीआयआयची संसाधने आणि त्यांच्या खरेदी क्षमतेमध्ये घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

फेब्रुवारी २०२६ अखेरीस समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांकडे असलेली रोख रक्कम १.७८ लाख कोटी रुपये होती, जी एप्रिल २०२५ च्या तुलनेत २४ टक्क्यांनी वाढली आहे. अर्थात खरेदीला टाळून अथवा गुंतवणुकीविना रोख शिल्लक राखण्याकडे म्युच्युअल फंडांचा कल दिसतो. यामुळे, बाजाराला गती देण्यासाठी गेल्या पाच वर्षांतील कधी नव्हता इतका सध्या आपण परकीय गुंतवणुकीच्या प्रवाहावर अवलंबून असल्याचे विश्लेषक सांगतात.