Ajit Agarkar Property : भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मुंबईतील घराची विक्री केल्याचा व्यवहार समोर आला आहे. आगरकर यांनी शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या निवासी भागांपैकी एक असलेल्या ‘वांद्रे पश्चिम’ येथील आपले निवासी अपार्टमेंट ४ कोटींना विकले आहे. रिअल इस्टेट ॲनालिटिक्स फर्म ‘स्क्वेअर यार्ड्स’ने तपासलेल्या मालमत्ता नोंदणी दस्तऐवजांमधून ही माहिती समोर आली आहे.
अजित आगरकर यांच्या अपार्टमेंटचे वैशिष्ट्य आणि किंमत
अजित आगरकर यांचे हे घर वांद्रे पश्चिमेकडील अत्यंत प्रसिद्ध अशा ‘ज्वेल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मध्ये आहे. या अपार्टमेंटचे बिल्ट-अप क्षेत्रफळ अंदाजे १,२२९ चौरस फूट इतके आहे. घरासोबत खरेदीदाराला दोन कार पार्किंग स्पेस देखील मिळाल्या आहेत. नोंदणी दस्तऐवजांनुसार, या ४ कोटींच्या व्यवहारासाठी २४ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे.
वांद्रे पश्चिम भागालाच पहिली पसंती का?
मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये वांद्रे पश्चिम हा भाग नेहमीच लक्झरी आणि प्रीमियम हाऊसिंगसाठी आघाडीवर राहिला आहे. याचं मुख्य कारण आहे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ आणि नरिमन पॉईंट ही मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्र पायाशी आहेत. उपनगरीय रेल्वे, मेट्रो सेवा आणि प्रमुख रस्ते नेटवर्कमुळे येथील कनेक्टिव्हिटी अत्यंत वेगवान आहे. वांद्रे परिसरातील उत्तम जीवनशैली आणि पायाभूत सुविधांमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आणि व्यावसायिक या भागातील घरांना पहिली पसंती देतात. त्यामुळे या भागातील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळतात.
अजित आगरकर यांची कारकीर्द
भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या अजित आगरकर यांनी १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एक दशकापेक्षा जास्त कार्यकाळात त्यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. तर त्यांच्या नावावर ३,५०० हून अधिक धावांची नोंद आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी क्रीडा प्रशासनात प्रवेश केला आणि २०२३ मध्ये त्यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता पदावर नियुक्ती करण्यात आली.
अजित आगरकरांच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाचा वाढता आलेख
अजित आगरकर यांनी राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक (२०२४ आणि २०२६) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (२०२५) जिंकली असून, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरी गाठली आहे. आता अजित आगरकर यांचे लक्ष्य पुढील वर्षी येणारा २०२७ चा विश्वषचक जिंकणे आहे.
