Freshworks Layoffs 2026 : सध्या आयटी क्षेत्रात कर्मचारी कपातीची लाट आली असून यात आणखी एक नाव जोडले गेले आहे. कॉग्झिटंटनंतर आता ‘फ्रेशवर्क्स’ या कंपनीने आपल्या एकूण कर्मचारी संख्येच्या ११ टक्के म्हणजेच सुमारे ५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वाढती गुंतवणूक आणि व्यवसायाची पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास ५०,००० लोकांच्या नोकऱ्या यामध्ये गेल्या असून याचा भारतीयांना सर्वाधिक फटका बसला आहे.
फ्रेशवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनिस वूडसाइड यांनी ६ मे २०२६ रोजी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत पत्रात या कपातीची अधिकृत माहिती दिली. कंपनी आपल्या जागतिक कार्यबळाची पुनर्रचना करत असून, भविष्यातील वाढीसाठी आणि एआय युगात वेगाने पुढे जाण्यासाठी हा बदल अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
ईमेलद्वारे दिली जाणार माहिती
‘तुमची नोकरी आहे की गेली?’ याची माहिती उत्तर अमेरिका आणि भारत येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापनाकडून ईमेलद्वारे दिली जाणार आहे. इतर देशांतील कर्मचाऱ्यांना तिथल्या स्थानिक नियमांनुसार कळवण्यात येईल. अनेक प्रतिभावान सहकाऱ्यांना निरोप देणे हा निर्णय सोपा नव्हता, अशा भावना सीईओ वूडसाइड यांनी व्यक्त केल्या आहेत.
एआय आणि ग्रोथ स्ट्रॅटेजीवर भर
कोणत्या विभागातील कर्मचारी कपात करण्यात आली आहे, हे कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र, कंपनीच्या ‘एम्प्लॉयी एक्सपिरियन्स’, ‘कस्टमर एक्सपिरियन्स’ आणि एआय विभागांमध्ये चांगली वाढ होत असल्याचे सीईओ यांनी नमूद केले. कंपनीच्या मोठ्या व्यवहारांपैकी निम्म्याहून अधिक व्यवहारांमध्ये एआयचा समावेश आहे, ज्यामुळे कंपनी आपली संरचना बदलत आहे.
प्रभावित कर्मचाऱ्यांना कंपनी करणार मदत
नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काही सुविधा देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये पगाराच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. यात २०२६ च्या पहिल्या तिमाहीचा बोनस दिला जाणार असून नवीन नोकरी मिळेपर्यंत आरोग्य सुविधाही उपलब्ध असणार आहेत. याशिवाय नवीन नोकरी शोधण्यासाठी करिअर सर्व्हिसेसची मदत पुरवली जाईल.
स्वतःला अपडेट करणे हाच पर्याय
कॉग्झिटंटनंतर आता फ्रेशवर्क्सने घेतलेला हा निर्णय आयटी क्षेत्रातील बदलत्या स्वरूपाचे संकेत आहेत. एआयमुळे अनेक पारंपारिक नोकऱ्या कमी होत असल्या तरी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित संधी निर्माण होत आहेत. कर्मचाऱ्यांसाठी आता ‘री-स्किलिंग’ म्हणजे स्वतःला अपडेट करणे हाच सुरक्षिततेचा एकमेव मार्ग उरला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
