FSSAI Bans Dabur Products : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न व औषध प्रसासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत शेकडो हॉटेल्स आणि अन्न उत्पादक कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. दुसरीकडे देशातील अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण विभागानेही (FSSAI) कडक भूमिका घेतली आहे. प्रसिद्ध एफएमसीजी (FMCG) कंपनी ‘डाबर इंडिया’ एफएसएसएआयने अत्यंत कठोर कारवाई केली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याने FSSAI ने कंपनीच्या अनेक खाद्यपदार्थांच्या विक्रीवर तातडीने बंदी घातली आहे.

कोणत्या उत्पादनांवर झाली कारवाई?

FSSAI ने घेतलेल्या या निर्णयाचा फटका डाबरच्या अनेक प्रमुख उत्पादनांना बसला आहे. यामध्ये डाबर हनीमधील ‘१००% शुद्ध’चे दावे, हिमालयन ऑरगॅनिक ॲपल सायडर व्हिनेगर, वर्जिन कोकोनट ऑइल आणि तीळ तेल, डाबर गायीचे तूप आणि होममेड कोकोनट मिल्क आणि नारळ पाणी या उत्पादनांचा समावेश आहे.

FSSAI चा मुख्य आक्षेप काय आहे?

नियामक मंडळाच्या तपासणीत डाबरच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि उत्पादनांवर अन्न सुरक्षा आणि मानके नियम, २०१८ चे थेट उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले. डाबरचे ‘हिमालयन ऑरगॅनिक ॲपल सायडर व्हिनेगर’ आणि ‘ऑरगॅनिक हनी’ या उत्पादनांवर FSSAI ची मान्यता नसतानाही ‘जैविक भारत’चा लोगो वापरण्यात आला होता. तर ‘डाबर होममेड कोकोनट मिल्क’ वर ‘१००% शुद्धता’ असा दावा करण्यात आला होता. नियमांनुसार, ‘कंपाउंड फूड’ वर असा दावा करण्यास मनाई आहे.

‘१००% नॅचरल’, ‘१००% ऑरगॅनिक’ आणि ‘१००% प्युरिटी गॅरंटीड’ यांसारखे शब्द प्रयोग ग्राहकांची दीशाभूल करणारे असून यातील दावे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करता येत नाहीत. डाबरला यापूर्वीच हे दावे हटवण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून कोणतीही समाधानकारक सुधारणा न झाल्यामुळे अखेर विक्री बंदीची कठोर कारवाई करावी लागली,” असे FSSAI ने स्पष्ट केले.

कंपनीला १५ दिवसांची मुदत

FSSAI ने डाबर इंडियाला सर्व संबंधित उत्पादनांची विक्री त्वरित थांबवण्याचे आदेश दिले असून, नियमांचे पालन केल्याचा कृती अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, “आम्हाला FSSAI ची नोटीस मिळाली असून नोटिशीमध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांची आणि आमच्या संकेतस्थळावरील माहितीची आम्ही गांभीर्याने तपासणी करत असल्याची प्रतिक्रिया दिली.

शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

डाबरवरच्या या कारवाईचा परिणाम मंगळवारी शेअर बाजारात पाहायला मिळाला. शेअरच्या किमतीत ४.३२ टक्के इतकी घसरण झाली आहे. सध्या शेअरचा भाव ४०७.४० रुपये इतका आहे. मागील ६ महिन्यात डाबर इंडियाचा शेअर तब्बल १९ टक्के आपटला आहे. कंपनीचे बाजार भांडवल ७४,२८७ कोटी रुपये इतके आहे.