Baramati McDowell No 1 Rum Ban: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात निकष पूर्ण न झाल्यामुळे देशभरातील विविध उत्पादन प्रकल्पांमध्ये तयार होणाऱ्या काही कंपन्यांच्या मद्याच्या विशिष्ठ ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. यामध्ये बारामतीतील मेसर्स युनायटेड स्पिरिट्सच्या मॅकडोवेल्स नंबर १ रम आणि खोपोलीतील मेसर्स मोहन रॉकी स्प्रिंगवॉटरच्या उत्पादन प्रकल्पातील ओल्ड मंक रमच्या द लेजंड, गोल्ड रिझर्व्ह आणि एक्सएक्सएक्स मॅच्युअर्ड रम यांचा समावेश आहे.
मद्यांमध्ये परवानगी नसलेल्या फ्लेवर्सचा वापर आणि या पेयांच्या निर्मितीपासून ते साठवणुकीदरम्यानच्या कालावधीविषयी दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी FSSAI ने ही कारवाई केली आहे. FSSAI ने याबाबत आपल्या अधिकृत संकेतस्थळासह आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही याबाबत निवेदन जाहीर केले आहे.
विक्रीवर बंदी घालण्यात आलेली उत्पादने
मेसर्स युनायटेड स्पिरिट्स, बारामती</p>
(ब्रँड: मॅकडोवेल्स नंबर १ रम)
मेसर्स मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर, खोपोली युनिट
(ब्रँड: ओल्ड मंक रमचे ३ प्रकार: द लेजंड, गोल्ड रिझर्व्ह आणि एक्सएक्सएक्स मॅच्युअर्ड रम)
मेसर्स इनब्र्यू बेव्हरेजेस, मध्य प्रदेश
(ब्रँड: बॅगपायपर डिलक्स व्हिस्की, ओल्ड कास्क डिलक्स एक्सएक्सएक्स रम)
मेसर्स असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रुअरीज, मध्य प्रदेश
(ब्रँड: सेंट्रल प्रॉव्हिन्स व्हिस्की, मॅकडोवेल्स नंबर १ सेलिब्रेशन मॅच्युअर्ड एक्सएक्सएक्स रम)
मेसर्स युनायटेड स्पिरिट्स, मध्य प्रदेश
(ब्रँड: अँटिक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की)
याचबरोबर FSSAI ने गोव्यात मेसर्स मँडेक्सी डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज यांच्या परिसरात तपासणी आणि नमुने गोळा करण्याची कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणात महाराष्ट्रातील आणखी सहा उत्पादकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुढील आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येणार आहे.
ग्राहकांनी चिंता करावी का?
FSSAI ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, सर्वच मद्य उत्पादक आपल्या उत्पादनांमध्ये परवाणगी नसलेल्या फ्लेवर्सचा वापर किंवा दिशाभूल करणारे दावे करत नाहीत. अनेक उत्पादक नियमांचे पूर्णपणे पालन करून मद्यपेयांचे उत्पादन करत आहेत. मात्र, केवळ काही मोजकेच उत्पादक प्रामुख्याने न्यूट्रल अल्कोहोल किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलपासून पेये तयार करतात, ज्यामध्ये प्रमाणित अल्कोहोलयुक्त पेयांशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण फ्लेवरचा अभाव असतो आणि त्यानंतर ती वैशिष्ट्ये पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यात एकसारखे किंवा कृत्रिम फ्लेवर्स मिसळले जातात.
प्रमाणित मद्यपेयांची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि सुगंध निर्माण करण्यासाठी रममध्ये रम फ्लेवर किंवा व्हिस्कीमध्ये व्हिस्की फ्लेवर मिसळण्याची कोणतीही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त उत्पादन पद्धत अस्तित्वात नसल्याचेही FSSAI ने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
