FSSAI Energy Drinks Ban directive triggers market shortage and distributor panic: FSSAI ने पॅकवरून “एनर्जी ड्रिंक्स” हे लेबल काढण्यासाठी दिलेल्या ९० दिवसांच्या मुदतीमुळे देशभरातील कोल्ड ड्रिंक्स वितरकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी कंपन्यांकडून एनर्जी ड्रिंक्सचा उपलब्ध साठा घेण्यास नकार दिल्याने, किरकोळ दुकानांमध्ये रेडबुल, पेप्सिकोचे स्टिंग, मॉन्स्टर, हेल, कॅम्पा एनर्जी आणि कोका-कोलाचे थम्स अप चार्ज्ड यांसारख्या ब्रँड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे.
कंपन्या आणि FSSAI यांच्यात हा मुद्दा संघर्षाचा विषय बनला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादनांची नावे आणि लेबलिंगशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप FSSAI ने केला असून, अशा कोणत्याही श्रेणीला आपण मान्यता देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
“अनेक वितरक कंपन्यांकडून सध्याचा साठा खरेदी करत नसल्यामुळे “एनर्जी ड्रिंक्स” या श्रेणीतील शीतपेयांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. तसेच, ‘एनर्जी ड्रिंक्स’चे लेबल असलेले हजारो कॅन्स ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ येथे अडकून पडले आहेत. कारण या कॅन्सची आयात प्रामुख्याने पश्चिम आशियातून केली जाते. हा सर्व साठा आता वाया जाणार आहे”, असे एका मोठ्या एनर्जी ड्रिंक्स उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
कंपन्यांनी ९० दिवसांची मुदत वाढवून देण्याची विनंती केली असली, तरी २ जुलै रोजी यासंदर्भातील निर्देश जारी करणाऱ्या FSSAI ने ती फेटाळून लावली आहे. भारताची एनर्जी ड्रिंक्सच्या बाजारपेठेची वार्षिक उलाढाल १३,००० कोटी रुपये इतकी असल्याचे मानले जाते. तरुण ग्राहकांकडून मिळणाऱ्या वाढत्या पसंतीमुळे त्यामध्ये २०-२५% दराने वाढ होत आहे.
इतर दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की, यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी अद्याप व्हायची बाकी असूनही विविध राज्य-स्तरीय एफडीए (FDA) प्राधिकरणांनी वितरकांच्या गोदामांमधून साठा जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
जुलैमध्ये, FSSAI ने कंपन्यांना अशा उत्पादनांवर ‘एनर्जी ड्रिंक’ हा शब्द वापरणे थांबवण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी स्पष्ट केले की, भारतात ‘एनर्जी ड्रिंक’ या श्रेणीसाठी कोणतेही अधिकृत मानक निश्चित केलेले नाही आणि ‘शरीर व मनाला चैतन्य देणारे’ किंवा ‘ऊर्जा वाढवणारे’ यांसारख्या दाव्यांसह हे लेबल ग्राहकांची दिशाभूल करू शकते.
