FSSAI PepsiCo Sting Energy Drink : महाराष्ट्रातील अन्न व औषध विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यानंतर आता देशातील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणही (FSSAI) आक्रमक झाले आहे. गेल्या महिन्याभरात एफएसएसएआयने अनेक मोठमोठ्या ब्रँडवर कारवाईचा बडगा उगारला आहे. FSSAI च्या कारवाईनंतर दिग्गज कंपन्यांचे धाबे दणाणले असून आता नियमांची अंमलबजावणी करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पेय उत्पादक कंपनी पेप्सिको इंडियाने आपल्या ‘स्टिंग’ या सॉफ्ट ड्रिंकबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

पेप्सिको इंडियाने ‘तो’ शब्द हटवला

ईटीच्या अहवालानुसार, FSSAI ने पेय उत्पादक कंपन्यांनी उत्पादनांच्या लेबलवरील ‘एनर्जी ड्रिंक’ हा शब्द हटवण्याचे आदेश दिले होते. सुधारित नियमांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना १ जुलैपासून ९० दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण, आदेशाची मुदत संपण्यापूर्वीच, पेप्सिको इंडियाने ‘स्टिंग’च्या कॅन्स आणि बाटल्यांवरून ‘एनर्जी’ हा शब्द काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. नवीन उत्पादनांवर ‘एनर्जी’ हे नाव दिसत नाही.

जाहिरातींमध्येही आवश्यक बदल

पेप्सिको इंडियाने केवळ बॉटल्स आणि कॅन्सवरील शब्दच हटवले नाहीत. तर जाहिरातींमध्येही बदल करत आहे. ‘फॉर्म्युला वन’चे खेळाचे अधिकृत पेय म्हणून याची जाहिरात करण्यात येत होती. फॉर्म्युला वनसोबत कंपनीची भागिदारी आहे. एफएसएसएआयच्या कारवाईनंतर आता या जाहिरातींमध्ये बदल करण्यात येत आहे. यावर बोलताना पेप्सिको इंडियाचे प्रवक्ते म्हणाले की कंपनी सर्व लागू नियमांचे पालन करत असल्याची खात्री करत आहे.

एफएसएसएआयचे आदेश काय?

गेल्या महिन्यात एफएसएसएआयने पेय उत्पादकांना जास्त कॅफीनयुक्त पेयांवर ‘एनर्जी ड्रिंक’ हा शब्द वापरण्यास बंद घातली होती. या श्रेणीतील उत्पादनांसाठी सध्या कोणतेही विहित भारतीय मानक नाहीत. अशा परिस्थितीत कंपन्यांकडून केले जाणारे काही दावे ग्राहकांची दिशाभूल करू शकतात अशी चिंता व्यक्त केली आहे. उद्योग अहवालानुसार, रेड बुल, मॉन्स्टर, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि हेल एनर्जी यांसारख्या या श्रेणीतील इतर कंपन्यांनी आवश्यकतांचे पालन करण्यासाठी वेळ मागवून घेतला आहे.

एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीत लक्षणीय वाढ

भारतीय बाजारपेठांमध्ये आता पेयांचा ट्रेंड बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, २०१७ मध्ये ‘स्टिंग’ बाजारात आल्यानंतर एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली. विशेषतः सर्वसामान्य ग्राहकांना लक्ष्य करून कमी किमतीत उपलब्ध केल्याने अल्पावधीत लोकप्रिय झाले आहेत.