Petrol Price Crosses 100: मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांच्याही पुढे गेले आहेत. भारतातील प्रमुख शहरांमध्ये अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत इंधनाच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत बिझनेस टुडेने वृत्त दिले आहे.

सोमवारी करण्यात आलेल्या इंधन दरवाढीनंतर २९ मे रोजी इंधनाचे दर स्थिर असले, तरी अलीकडच्या काळात झालेल्या दरवाढीचा एकत्रित परिणाम मात्र लक्षणीय ठरला आहे. दरांमध्ये करण्यात आलेल्या या ताज्या वाढीनंतर पेट्रोलच्या दरात २.६१ रुपये प्रति लिटरने, तर डिझेलच्या दरात २.७१ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तेल कंपन्या तोट्यात असतानाही त्यांनी दरवाढ केली नव्हती. मात्र, आता ही भरपाई करून घेण्याच्या उद्देशाने कंपन्यांनी ही दरवाढ केली आहे.

सूत्रांनी बिझनेस टुडे टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही, भविष्यात होणारी वाढ टप्प्याटप्प्याने होईल, अशी अपेक्षा आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होऊनही, गेल्या ७५ दिवसांपासून इंधन दर स्थिर ठेवण्यात आले होते. या काळात झालेल्या तोट्याची भरपाई करणे तेल कंपन्यांना आवश्यक आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी सांगितले होते की, तेल कंपन्यांना दररोज अंदाजे ७५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. १५ मे रोजी करण्यात आलेल्या दरवाढीमुळे हा तोटा साधारणपणे एक चतुर्थांशने कमी झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही, त्यामध्ये अद्यापही मोठी तफावत कायम आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याने ‘इन्फॉर्मिस्ट’ला सांगितले की, इंधनाच्या किमती टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला होता. महागाईचा प्रभाव मर्यादित ठेवण्याच्या गरजेतून हा निर्णय घेतला गेला. “तेल कंपन्या ग्राहकांचे शक्य तितके संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होत्या”, असे त्या अधिकाऱ्याने नमूद केले.

तसेच, या दरवाढीमुळे इंधनाच्या मागणीत मोठी घट होईल, अशी कोणतीही अपेक्षा कंपनीला नसल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. भविष्यातील दरवाढीचा नेमका आकडा अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही, या गोष्टीलाही त्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला.