पुणे : गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड कंपनीला डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात १७.६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीने चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत ३८७ कोटी रुपयांची विक्री केली आहे. त्याआधीच्या वर्षातील याच तिमाहीत ही विक्री ३५० कोटी रुपये होती. त्यात आता १०.४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीचा करोत्तर निव्वळ नफा ५६.२ कोटी रुपये आहे. आधीच्या वर्षातील याच तिमाहीत तो ४७.८ कोटी रुपये होता. त्यात आता १७.६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
याबाबत कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वायू गरवारे म्हणाले की, अमेरिकेच्या अतिरिक्त आयात शुल्काचा परिणाम आमच्या नफ्यावर झाला. हा परिणाम तिसऱ्या तिमाहीत दिसून आला आणि काही अंशी तो चौथ्या तिमाहीत दिसेल. कंपनीने अमेरिकी ग्राहक कायम ठेवण्याचे प्रयत्न केले.
आता आयात शुल्कात कपात झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात होईल. कंपनीच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यवसायात सुधारणा दिसून येत आहे. आगामी काही तिमाहीमध्ये कंपन्यांच्या नफ्यात चांगली वाढ दिसून येईल.
