Gautam Adani Net Worth Surges To $92.6 Billion Regains The Title Of Asia’s Richest Person: अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून हा टप्पा गाठला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’नुसार, अदाणी यांची एकूण संपत्ती आता ९२.६ अब्ज डॉलर्सवर (सुमारे ७.७ लाख कोटी रुपये) पोहोचली आहे. या वर्षात त्यांच्या संपत्तीत ८.१० अब्ज डॉलर्सची (६७,००० कोटी रुपये) वाढ झाली आहे. यामुळे, श्रीमंतांच्या जागतिक यादीत त्यांनी १९ वे स्थान पटकावले आहे. याउलट, अंबानी यांची एकूण संपत्ती सध्या ९०.८ अब्ज डॉलर्स (७.५ लाख कोटी रुपये) इतकी आहे. या वर्षात त्यांच्या संपत्तीत १६.९ अब्ज डॉलर्सची (१.४ लाख कोटी रुपये) घट झाली आहे.

गुरुवारी (१६ एप्रिल, २०२६) भारतीय शेअर बाजारात किरकोळ घसरण दिसून आली. मात्र, अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. यामुळे अदानी यांच्या एकूण संपत्तीत ३.५६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. दरम्यान, अंबानी यांच्या संपत्तीत ७६.७ दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली. रिलायन्सचे शेअर्स काल जवळपास स्थिर पातळीवर बंद झाले. श्रीमंतांच्या यादीत अंबानी सध्या आशियामध्ये दुसऱ्या आणि जागतिक स्तरावर २० व्या क्रमांकावर आहेत.

कोणाच्या संपत्तीत घट झाली?

या वर्षी, जगातील २० सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी सात जणांच्या निव्वळ संपत्तीत घट झाली आहे. फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नो यांना सर्वाधिक फटका बसला असून, त्यांची संपत्ती ४४ अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. अर्नो यांच्या व्यतिरिक्त, या यादीमध्ये स्टीव्ह बाल्मर, ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, प्रख्यात गुंतवणूकदार वॉरेन बफे, स्पॅनिश उद्योगपती अमांसिओ ओर्टेगा आणि मुकेश अंबानी यांचा समावेश आहे.

जगातील सर्वात श्रीमंत १० लोक

एलॉन मस्क यांनी ६५६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहेत. या वर्षी, त्यांच्या एकूण संपत्तीत ३६.७ अब्ज डॉलर्सची प्रचंड वाढ झाली आहे. गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज २८६ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ॲमेझॉनचे जेफ बेझोस (२६९ अब्ज डॉलर्स), सर्गेई ब्रिन (२६६ अब्ज डॉलर्स), मार्क झुकरबर्ग (२३९ अब्ज डॉलर्स), लॅरी एलिसन (२३० अब्ज डॉलर्स), मायकल डेल (१७० अब्ज डॉलर्स), जेन्सेन हुआंग (१६४ अब्ज डॉलर्स), बर्नार्ड अर्नोल्ट (१६४ अब्ज डॉलर्स) आणि जिम वॉल्टन (१५० अब्ज डॉलर्स) यांचाही या शीर्ष १० जणांच्या यादीत समावेश आहे.