Ambani vs Adani Net Worth : पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती यामुळे जगातील श्रीमंताच्या यादीत मोठी उलथापालथ झाली आहे. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीत यावर्षी ३५.४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून, त्यांची एकूण संपत्ती १२० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. दुसरीकडे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच अदानी यांच्याइतकी संपत्ती जमा केली आहे. मस्क यांनी चालू वर्षात ११९ अब्ज डॉलर्सची कमाई केली. पुढील महिन्यात त्यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीचा आयपीओ येत असून त्यानंतर ते जगातील पहिले ट्रिलियनपती बनतील. दरम्यान, भारतातील दुसरे सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्ती मोठी घट झाली आहे.

अदानींनी जेवढं कमावलं तेवढं अंबानींनी गमावलं

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निव्वळ संपत्ती या वर्षी मोठी घट पाहायला मिळाली. अंबानींच्या संपत्तीत एकूण १८.९ अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. म्हणजे अंबानींनी जेवढं गमावलं, त्याच्या दुप्पट कमाई गौमत अदानी यांनी केली. या वर्षात अदानी समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. अनेक नवीन कंपन्यांचे हंस्तातरण करण्यात आले. ज्याचा फायदा उद्योगपती गौतम अदानींना झाला.

एलॉन मस्क यांची घोडदौड सुरुच

ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, एलॉन मस्क यांच्या संपत्तीत बुधवारी एकाच दिवसात ४.८६ अब्ज डॉलरची वाढ झाली. यानंतर त्यांची नेटवर्थ ७३८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गुगलचे संस्थापक लॅरी पेज असून त्यांची संपत्ती ३२८ अब्ज डॉलर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे सहकारी सर्गेई ब्रिन ३०५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह विराजमान आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस २९० अब्ज डॉलरसह चौथ्या तर लॅरी एलिसन २४७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या नंबरवर आहेत.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची नेटवर्थ २२५ अब्ज डॉलर असून या यादीत ते ६व्या स्थानावर आहेत. मायकल डेल १९२ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ७व्या नंबरवर आहेत. जेन्सन हुआंग (१७६ अब्ज डॉलर) आठव्या, बर्नाड आरनॉल्ट (१६४ अब्ज डॉलर) नऊ आणि जिम वॉल्टन १०व्या स्थानावर आहेत. जगातील पहिल्या १० श्रीमंतांमध्ये एकाही भारतीय व्यक्तीचे नाव नाही. या यादीत गौतम अदानी १७व्या तर मुकेश अंबानी (८८.८ अब्ज डॉलर) २१ नंबरवर आहेत. या वर्षी अंबानींच्या संपत्तीत १८.९ अब्ज डॉलरची घट झाली आहे.