“लवकर सुरुवात करणाऱ्याला यश नक्की मिळते” अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. आयुष्यात लवकर बचत सुरू करणाऱ्या व्यक्तीपेक्षा ही म्हण दुसऱ्या कोणालाही अधिक लागू पडत नाही. लहान वयात बचत करण्यास सुरुवात करणारे तरुण स्मार्ट आणि योग्य गुंतवणूक करून आर्थिक स्वावलंबीत्वाच्या मार्गावर वेगाने पुढे जाऊ शकतात. हे विशेषतः ‘जेन झी’ म्हणजेच १९९७ ते २०१२ दरम्यान जन्माला आलेल्या पिढीसाठी अधिक लागू होते. होम क्रेडिट इंडियाचे प्रमुख संशोधन ‘द ग्रेट इंडियन वॉलेट २०२५’नुसार, जेन झी मधील केवळ ५६ टक्के तरुण त्यांच्या मासिक खर्चांनंतर काही लक्षणीय बचत करू शकतात.

डिजिटल तंत्रज्ञानाने जोडलेल्या या जगात, जिथे सोशल मीडिया खरेदीच्या निर्णयांवर प्रभाव टाकतो आणि एका यूपीआय टॅपवर त्वरित खरेदी पूर्ण होते; तिथे झेन झी पिढीने सुलभतेच्या कलेमध्ये प्राविण्य मिळवले आहे. तरीसुद्धा, पैशांचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते, तेव्हा या पिढीला पारंपारिक बचतीच्या सवयींच्या पलीकडे जाऊन अधिक स्मार्ट आर्थिक नियोजनाचा स्वीकार करण्याची गरज आहे. जेन झी तरुणांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी, आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी आणि गतिमान अर्थव्यवस्थेत स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मदत करतील, असे ‘आर्थिकदृष्ट्या जबाबदार’ बनण्याचे नियम खालीलप्रमाणे आहे.

नियम १: तुमच्या आर्थिक स्थितीची तपासणी करा: खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खर्चाचा हिशोब ठेवण्यापासून सुरुवात करणे. आपण केलेल्या काही खर्चांची खरोखरंच गरज आहे का, याचे मूल्यमापन करण्यासाठी पैशांची आवक (उत्पन्न) आणि जावक (खर्च) यावर लक्ष ठेवणे ही एक चांगली सुरुवात आहे.

नियम २: एफओएमओचे रूपांतर गुंतवणूक धोरणात करा: एफओएमओ (काहीतरी राहून जाण्याची भीती) या संकल्पनेचा अर्थ बदलून “मोठ्या परताव्यांना मुकण्याची भीती” असा केल्यास व्यक्ती खर्चाकडून गुंतवणुकीकडे वळू शकते. म्युच्युअल फंड, एसआयपी किंवा इंडेक्स फंडामधील प्रत्येक लहान गुंतवणूक महत्त्वाची असते, कारण कालावधीनुसार यातून मोठा परतावा मिळू शकतो. अर्थात, रिल्स किंवा ट्रेंडिंग विषयांना बळी न पडता स्वतः संशोधन करून गुंतवणुकीचे पर्याय निवडताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

नियम ३: आपत्कालीन निधी उभारा आणि स्वतःचे भविष्य सुरक्षित करा: सध्याचा काळ अनिश्चिततेचा आहे. त्यामुळे किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाइतकी रक्कम इमर्जन्सी फंड (आपत्कालीन निधी) म्हणून बाजूला ठेवणे आवश्यक आहे. वैद्यकीय आणीबाणी असो की अचानक गेलेली नोकरी, हा निधी कठीण प्रसंगी मोठा आधार देऊ शकतो.

आर्थिकदृष्ट्या जबाबदार बनण्याच्या या नियमांचे पालन करण्यासोबत काही सामान्य धोक्यांपासून सावध राहा, जसे मित्रांच्या दबावापोटी क्रिप्टो किंवा शेअर्समध्ये आंधळेपणाने गुंतवणूक करणे, किंवा सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या कोणाच्यातरी परिपूर्ण आयुष्याने प्रभावित होणे. आर्थिकदृष्ट्या जबाबदार बनणे कठीण किंवा कंटाळवाणे नाही. आयुष्यातील वाटचाल सुलभ करण्याचा आणि वेळेत यश मिळवण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यामुळे दीर्घकाळात तुम्ही इतरांच्या पुढे राहू शकाल.

त्यामुळे, पुढच्या वेळी एखाद्या शॉपिंग ॲपचे नोटिफिकेशन येईल किंवा एखादा आकर्षक सेल फोनवर पॉप-अप होईल, तेव्हा “पे”वर टॅप करण्यापूर्वी क्षणभर थांबून विचार करा. खर्चाची तपासणी करणे, एफओएमओचे रूपांतर गुंतवणुकीत करणे आणि आपत्कालीन निधी उभारणे म्हणजे आजच्या आनंदावर पाणी सोडणे नाही, तर उद्याची स्वप्ने साकारण्यासाठी पाया रचणे आहे. जेन झी पिढीमध्ये वेगाने निर्णय घेण्याचे कौशल्य आधीपासूनच आहे, आर्थिकदृष्ट्या जबाबदार बनणे म्हणजे प्रत्येक रुपयाचा समजूतदारपणे वापर करत त्या कौशल्याला योग्य दिशा देणे इतकेच आहे.