Gen Z Money Mindset Tips for Young Adults: जेव्हा पैशांचा विषय येतो, तेव्हा तरुणांना बजेट अधिक चांगल्या प्रकारे करा, जास्त बचत करा आणि कमी खर्च करा असा नेहमीचाच सल्ला अनेकदा दिला जातो. परंतु अनेक तरुणांच्या आर्थिक निर्णयांवर चिंता, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि कदाचित सर्वात महत्त्वाचे म्हणजे घराच्या किमती आणि नोकरीची असुरक्षितता यांसारख्या आर्थिक गोष्टींचा प्रभाव पडतो.

इथेच फायनान्शियल थेरपीची भूमिका येते. हे नवे क्षेत्र लोकांच्या कमाई, खर्च आणि संपत्तीबद्दलच्या विचारांना आकार देणाऱ्या भावनिक आणि मानसिक घटकांचा अभ्यास करते. न्यूयॉर्कमधील ‘ट्रायबेका थेरपी’चे संस्थापक आणि मनोचिकित्सक मॅट लंडक्विस्ट, लोकांना पैशांसोबतचे त्यांचे नाते समजून घेण्यास मदत करण्यात तज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक तरुणांसबोतच आपल्या मुलांच्या प्रौढत्वातील संक्रमणादरम्यान मार्गदर्शन करणाऱ्या पालकांसोबतही काम केले आहे.

न्यूयॉर्क शहरातून रॉयटर्सशी बोलताना, लंडक्विस्ट यांनी फायनान्शियल थेरपी म्हणजे काय, ‘जेन झेड’ (Gen Z) मागील पिढ्यांपेक्षा पैशांवर अधिक लक्ष केंद्रित का करत आहे आणि तरुण लोक काम व पारंपरिक टप्प्यांबद्दल कसा पुनर्विचार करत आहेत यावर भाष्य केले आहे.

जेव्हा आपण ‘जेनझेड’ आणि ‘मिलेनियल्स’ (Millennials) यांचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याबाबतचे त्यांचे वर्तन पाहतो, तेव्हा आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत कोणती गोष्ट प्रकर्षाने जाणवते? असा प्रश्न मॅट लंडक्विस्ट यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “ही पिढी आधीच्या पिढ्यांमधील तरुणांच्या तुलनेत अर्थव्यवस्थेबद्दल अधिक चर्चा करताना दिसते. त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या संभाषणांमध्ये आणि स्वतःचे आयुष्य आखण्याच्या पद्धतीमध्येही या विषयाचा प्रभाव अधिक दिसून येतो. त्यांच्या मनात हा निर्धार अधिक ठाम आहे की, ‘माझा मार्ग कोणाकडे तरी नोकरी करण्याचा नसेल, तर माझा मार्ग स्वतःचा उपक्रम, स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचा ब्रँड चालवण्याचा असेल.’ इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्समध्ये हे नक्कीच पाहायला मिळते.”

पैसा हीच जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट नाही हे…

त्यांना पुढे विचारण्यात आले की, आजच्या काळात विशी-तिशीत असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी पैसा, काम आणि यश यांच्याशी असलेले अधिक निरोगी नाते कसे असू शकते?

यावर मॅट लंडक्विस्ट म्हणाले, “पैसा हीच जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट नाही हे मान्य करणे वेगळे आणि आनंद, आपुलकी अन् नात्यांसारख्या इतर महत्त्वाच्या गोष्टींवर कमाई व संपत्ती मात करणार नाही अशा प्रकारे आयुष्याचे नियोजन करणे वेगळे. पण त्याच वेळी माझ्या मते, या दिशेने जाणारा मार्ग हा पैशाचे योग्य भान ठेवून आणि त्याबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेऊनच पुढे जातो.”