मुंबई: आखातात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाच्या वणव्यामुळे एक्सईडी एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंटने प्रस्तावित केलेली प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) पुढे ढकलली आहे.
गुजरातमधील गिफ्ट सिटीच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात आयएफएससीमधून खुला होत असलेला हा पहिलावहिला आयपीओ ६ मार्चला बाजाराला धडक देणार होता. आता मात्र तो १६ मार्चपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. या आयपीओसाठी प्रति समभाग १० ते १०.५ डॉलरचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. २४ मार्चपर्यंत आयपीओसाठी बोली लावता येईल.
डॉलर-मूल्यांकित आयपीओ आयएफएससीएअंतर्गत पात्र गुंतवणूकदारांसाठी खुला असेल, ज्यामध्ये अनिवासी भारतीय (एनआरआय), परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय), संस्थात्मक गुंतवणूकदार आणि इतर परवानगी असलेल्या परदेशी संस्था/ व्यक्तींचा समावेश असेल. हे समभाग एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज आणि गिफ्ट सिटी येथील इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंजवर सूचिबद्ध केले जातील आणि परदेशी गुंतवणूकदारांना लक्ष्य करून डॉलर-मूल्यांकित साधन म्हणून त्यात व्यवहार केले जातील.
कंपनी काय करते? एक्सईडी एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट ही एक्झिक्युटिव्ह शिक्षणाची एक आघाडीची कंपनी आहे, जी २५ हून अधिक देशांमध्ये आस्थापनांतील वरिष्ठ व्यावसायिकांना सेवा देते. कंपनीचे कार्य भारत, आग्नेय आशिया आणि उत्तर अमेरिकेत पसरलेले आहे. व्यवस्थापकीय किंवा कार्यकारी स्तरावरील व्यावसायिकांसाठी किंवा त्या पदांसाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींसाठी कंपनीने खास कार्यक्रम आणि अभ्यासक्रम तयार केले आहेत. कार्यकारी शिक्षण कार्यक्रम हे साधारणपणे अल्पकालीन, पदवी नसलेले अभ्यासक्रम असतात.
