वृत्तसंस्था, नवी दिली : ई-कॉमर्स, ॲपआधारित टॅक्सीसेवा यासह इतर अनेक ऑनलाइन सेवा घरपोच देणाऱ्या गिग कामगारांना वित्तीय संस्थांकडून कर्जाचे दरवाजे बंद असल्याचे वास्तव ‘अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स रिसर्च’ या संशोधनपत्रिकेतील अहवालातून समोर आले आहे. या परिस्थितीत वित्ततंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या गिग कामगारांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.

गिग कामगारांना नियमित मासिक उत्पन्न नसते. त्यांचे उत्पन्न नियमित नसल्याने वित्तीय संस्थांकडून त्यांना कर्जपुरवठा केला जात नाही. जागतिक बँकेच्या अहवालातही नुकतेच यावर बोट ठेवण्यात आले होते. स्वयंउद्योजकांप्रमाणे गिग कामगारांनाही अर्थसाहाय्याची गरज असते. त्यांना दुचाकी खरेदी अथवा तिच्या देखभालीसाठी कर्जाची आवश्यकता भासू शकते. गिग कामगारांना त्यांची उपकऱणे अद्ययावत करण्यासाठी पैशांची गरज भासते. मात्र, स्थिर उत्पन्न नसल्याने त्यांचा कर्जापासून वंचित राहावे लागते, असे जागतिक बँकेने म्हटले होते.

आता ‘अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स रिसर्च’मधील टिपणानुसार, गिग कामगार हे एकाच वेळी अनेक मंचांसाठी काम करीत असतात. मात्र, गिग कामगारांनी दुचाकी खरेदीसाठी अथवा अन्य कारणांसाठी कर्जाची मागणी केल्यास वित्तीय संस्थांकडून नकार मिळतो. कारण बँका या खात्यात जमा होणारी नियमित रक्कम पाहतात. याचवेळी गिग कामगारांना त्यांच्या कंपनीकडूनही ते काम करीत असल्याचे अधिकृत पुरावे दिले जात नाहीत. देशातील ७५ टक्के गिग कामगारांना वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळविण्यासाठी झगडावे लागते.

नवीन वित्ततंत्रज्ञान कंपन्यांकडून कर्ज पुरवठ्यातील ही असमानता दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कर्ज देताना या कंपन्या केवळ मासिक उत्पन्न हा निकष गृहित धरत नाहीत. या कंपन्या गिग कामगाराला उत्पन्न कशा पद्धतीने मिळते आणि अर्जदाराचे आर्थिक वर्तन अशा व्यापक निकषांचा विचार करतात. याचवेळी या कंपन्यांकडून डिजिटल माध्यमातून अतिशय जलद पद्धतीने कर्जपुरवठा केला जातो. ही कर्जे तारणमुक्त असतात. अनियमित उत्पन्न असलेल्या कामगारांना यामुळे अर्थसाहाय्याची नवा मार्ग खुला झाला आहे.

क्रेडिट४श्युअर या वित्तसंस्थेचे संस्थापक विशाल भाटी म्हणाले, गिग कामगार हे आर्थिकदृष्ट्या सक्रिय असतात, परंतु त्यांचे उत्पन्न नियमित नसते. त्यामुळे त्याकडे व्यापक आर्थिक निकषांच्या आधारे पाहण्याची आवश्यकता आहे. गिग कामगारांना वेगळ्या निकषांच्या आधारावर आम्ही पारदर्शी पद्धतीने जलद कर्ज पुरवठा करीत आहोत.