नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे खनिज तेलाच्या किमती दीर्घकाळ चढ्या राहण्याची शक्यता असून, यातून जागतिक पातळीवर चलनवाढीचा वणवा पेटेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा यांनी सोमवारी दिला.
जॉर्जिएव्हा म्हणाल्या की, भू-राजकीय तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आधीपासूनच ताण आलेला आहे. आता पश्चिम आशियातील संघर्षामुळे हा ताण आणखी वाढू लागला आहे. या युद्धामुळे खनिज तेलाच्या बाजारतपेठेत दीर्घकाळ उलथापालथ सुरू राहिल्यास ऊर्जेच्या किमतीत सातत्याने वाढ होईल. त्यातून महागाईवर मोठा परिणाम होईल. तेलाच्या किमतीत १० टक्के वाढ होऊन ती वर्षभर कायम राहिल्यास जागतिक महागाईत ४० आधारबिंदूंनी वाढ होईल. सध्याच्या बदललेल्या जागतिक स्थितीत सर्व धोरणकर्त्यांनी अशक्य गोष्टींचा विचार करून त्यांचा सामना करण्यासाठी आधीपासून तयारी करायला हवी.
अमेरिका-इस्रायलने इराणच्या विरोधात युद्ध सुरू केले आहे. यामुळे जागतिक पातळीवर ऊर्जा बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण केली आहे. या युद्धामुळे जागतिक पातळीवरील तेल वाहतुकीच्या जलमार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचे परिणाम तेलाच्या किमतीवर होत आहेत. युद्धामुळे होर्मूझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक ठप्प झाली आहे. जागतिक तेल पुरवठ्यापैकी २० टक्के तेलाची वाहतूक या सामुद्रधुनीतून होते.
भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम
पश्चिम आशियातील संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर व्यापक स्तरावर परिणाम होऊ शकतो. या युद्धामुळे रुपयाच्या विनिमय मूल्यावर ताण येईल आणि तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने महागाई वाढेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाची किंमत १०० डॉलरवर गेली असून, द्रवरूप नैसर्गिक वायूची किंमत ५० टक्क्यांनी वाढली आहे, असे अर्थमंत्रालयाने मासिक आर्थिक पाहणीत म्हटले आहे.
पाकिस्तानला चटके
जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ सुरू असल्याने त्याचे चटके पाकिस्तानला बसू लागले आहेत. पाकिस्तानमध्ये इंधन दरात २० टक्के वाढ करण्यात आली आहे. तिथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ५५ पाकिस्तानी रुपयांची वाढ कऱण्यात आली आहे. त्यामुळे तिथे पेट्रोलचा दर आता लिटरमागे ३२१ पाकिस्तानी रुपये आणि डिझेलचा दर ३३५ पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची स्थिती सध्या खूपच नाजूक आणि ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आहे. सोमवारी प्रत्येक अमेरिकी डॉलरमागे २८५ ते २९५ पाकिस्तानी रुपये मोजावे लागावे, या दराने तेथील परकीय चलन बाजारात व्यवहार सुरू होते.
