Gold Silver Price Today : लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदीसाठी उत्सुक असलेल्या सामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे आज भारतीय बाजारपेठेतही काहीशी शांतता पाहायला मिळत आहे. आज कॉमेक्सवर सोन्याची किंमत ४,६१०.८० डॉलर प्रति औन्स, तर चांदीची किंमत ७५.८२० डॉलर प्रति औन्सवर पोहोचली आहे. सोने आता त्याच्या सर्वकालीन उच्चांकापासून तब्बल ३०,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या किमतीतही जवळपास १,५०,००० रुपयांनी घसरण झाली आहे.

कॉमेक्स आणि एमसीएक्स वरील स्थिती

मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात, म्हणजेच ३० एप्रिल २०२६ रोजी कॉमेक्स गोल्ड १.३५ टक्क्यांच्या घसरणीसह ४,६३६ डॉलर प्रति औन्सवर बंद झाले होते. तसेच चांदीमध्ये १.५ टक्क्यांची घसरण होऊन ती ७४.२३ डॉलर प्रति औन्सवर स्थिरावली होती. दुसरीकडे, देशांतर्गत एमसीएक्स बाजारात सोन्याचा भाव १,५१,३६३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,५१,००० रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

सोने-चांदीच्या किमती अस्थिर का?

अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढउताराचा परिणाम कमोडिटी बाजारावर होत आहे.
येणाऱ्या दिवसांत विविध देशांचे पीएमआय डेटा आणि अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी जाहीर होणार आहे, ज्यावर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला सोन्यात मोठी तेजी दिसली होती. मात्र, सध्या लग्नसराईच्या मोसमात मागणी असूनही किमतीत मर्यादित घसरण दिसत आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावं?

सध्याच्या घसरणीमुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळत असला, तरी बाजार अभ्यासकांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी सध्याची स्थिती अस्थिर असल्याने, बाजारातील बदलांवर लक्ष ठेवूनच गुंतवणुकीचा निर्णय घेणे समजूतदारपणाचे ठरेल. तसेच प्रत्येक घसरणीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात चांगला नफा मिळू शकतो.

भारताने लंडनहून १०४ टन सोने भारतात आणले

भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशात ठेवलेले १०४.२३ मेट्रिक टन सोने भारतात परत आणलं आले आहे. या सोन्याचा साठा बँकेच्या तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आला आहे. युद्ध आणि आर्थिक मंदीच्या भीतीपोटी सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगातील मध्यवर्ती बँकांचा कल सोन्याकडे वाढला आहे. चीन आणि भारत या आशियाई देशांनी गेल्या काही महिन्यांत विक्रमी सोने खरेदी केली आहे. भारताकडे सध्या ८०० टनांहून अधिक सोन्याचा साठा असून, यामुळे रुपयाला बळकटी मिळण्यास आणि देशाची परकीय चलन गंगाजळी सुरक्षित राहण्यास मोठी मदत होत आहे.