Gold- Silver Prices Today : मध्यपूर्वेतील संघर्ष शांत होण्याचे संकेत आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्या-चांदीला पुन्हा उभारी मिळाली आहे. गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या दरांनी उसळी घेतली आहे. गेल्या सत्रात सोन्याचे दर एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर, आता धातू बाजार सावरताना दिसत आहे. सोने-चांदी वधारली असली तरी अजूनही त्यांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा स्वस्त मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅम १४९,३३३ रुपयांपर्यंत झेप घेतली आहे, तर चांदीने १.७८% ची मोठी वाढ नोंदवत २३४,२२८ रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला आहे. डॉलरच्या मूल्यात झालेली किंचित घट हे या दरवाढीचे मुख्य कारण मानले जात आहे, कारण यामुळे बिगर-अमेरिकन खरेदीदारांसाठी सोने स्वस्त झाले आहे.

महागाई आणि कच्च्या तेलाचे संकट

कच्च्या तेलाचे संकट पुन्हा गडद होत असून आज दर ११९ डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्याने जागतिक महागाईची चिंता वाढली आहे. प्रामुख्याने अमेरिका-इराणमधील रखडलेली चर्चा आणि होर्मुज सामुद्रधुनीतील अनिश्चितता यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा धोक्यात आला असून, याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होत आहे.

फेडरल रिझर्व्हचे धोरण आणि अनिश्चितता

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजाचे दर स्थिर ठेवले असले तरी, वाढत्या महागाईमुळे भविष्यात व्याजदरात कपात कधी होणार, याबाबत मोठी अनिश्चितता आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या आगामी जीडीपी आणि महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे, ज्यामुळे बाजाराची पुढची दिशा स्पष्ट होईल.

सेंट्रल बँकांची खरेदी जोरात

‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालानुसार, २०२६ च्या पहिल्या तिमाहीत सोन्याची जागतिक मागणी २% नी वाढून १,२३०.९ टनांवर पोहोचली आहे. दागिन्यांच्या मागणीत घट झाली असली, तरी सोन्याची नाणी, विटा आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून होणारी सातत्यपूर्ण खरेदी यामुळे सोन्याच्या दरांना भक्कम आधार मिळत आहे.

विश्लेषकांच्या मते, जोपर्यंत डॉलरची मजबूती आणि ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेली महागाई कायम आहे, तोपर्यंत सोन्या-चांदीच्या बाजारात चढ-उतार कायम राहील. मात्र, ‘सेफ-हेवन’ मालमत्ता म्हणून सोन्याची मागणी आणि बँकांचा वाढता साठा यामुळे मोठ्या घसरणीला ब्रेक बसू शकतो.

भारतात सोने खरेदीचा ट्रेंड बदलला

एप्रिल २०२६ च्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात भारतात सोन्याच्या दरात ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सोने महाग झाले असले तरी त्याची खरेदी करण्यात भारतीयांना कसर सोडली नाही. फक्त आता सोने खरेदी करण्याचा ट्रेंड बदलताना दिसत आहे. लोक सोन्याच्या दागिन्यांपेक्षा डिजिटल गोल्ड, ईटीएफ सारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढवत आहे.