Gold and Silver Price : जागतिक भू-राजकीय तणाव आणि ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात सोन्याच्या आयातीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजार कॉमेक्सवर शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत फारसा बदल झालेला नसून त्या स्थिर आहेत. सोने आणि चांदी अजूनही त्यांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा खूप स्वस्त मिळत आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही संधी मानली जात आहे.
जागतिक आणि देशांर्गत बाजारातील स्थिती
कॉमेक्सवर हाजिर सोन्याची किंमत ४,६४०.५० डॉलर प्रति औंस आणि चांदी ७४.९३० डॉलर प्रति औंसवर स्थिरावली आहे. काल कच्च्या तेलाने ४ वर्षांचा उच्चांक गाठल्याने आज मोठी घसरण अपेक्षित होती, मात्र सध्या बाजार स्थिर आहे. तर एमसीएक्स गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याचा भाव १,५१,२२५ रुपये (प्रति १० ग्रॅम) आणि चांदी २,४४,६३८ रुपये (प्रति किलो) वर बंद झाला होता. जागतिक कल पाहता आज घरगुती बाजारातही दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
सेंट्रल बँकांचे धोरण आणि व्याजाचे दर
जागतिक स्तरावर महागाईचा धोका वाढत असल्याने प्रमुख मध्यवर्ती बँकांनी सावध पवित्रा घेतला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हसह बँक ऑफ जपान, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. २०२६ मध्ये अमेरिकेत दोनदा व्याजदर कपात होईल, असा अंदाज वर्तवणारे ब्रोकरेज फर्म आता आपल्या दाव्यांपासून मागे हटताना दिसत आहेत.
अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका
Axios च्या अहवालानुसार, अमेरिका इराणवर मर्यादित पण मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे, तर इराणनेही जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या तणावामुळे ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ लवकर उघडण्याची शक्यता कमी झाली आहे. ही परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास भारताला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
उच्चांकापेक्षा चांदीच्या दरात ४५ टक्क्यांची घसरण
या वर्षीच्या सुरुवातीला (२९ जानेवारी) चांदीने आपला सर्वकालीन उच्चांक (४,३९,३३० रुपये प्रति किलो) गाठला होता. मात्र, तिथून अवघ्या तीन महिन्यांत चांदी तब्बल ४५ टक्क्यांनी म्हणजेच १,९४,६९२ रुपयांनी स्वस्त झाली आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीत आणि आयात शुल्क स्पर्धेमुळे चांदीमध्ये मोठी घसरण होत आहे.
सोने अजूनही ३१ हजार रुपयांनी स्वस्त
चांदीप्रमाणे सोन्यातही मोठी घसरण झाली आहे. जानेवारीच्या सुरुवातील सोन्याने १,८३,००० प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. या भावापासून सोने आता तब्बल ३१,७७५ रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
गुंतवणूक करण्याचा कल बदलला
आतापर्यंत देशात सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रघात होता. मात्र, आता पहिल्यांदाच सोन्याच्या दागिन्यांपेक्षा ईटीएफ आणि डिजिटल गोल्ड सारख्या पर्यायांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
