Gold Siler Rate : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण संघर्ष पेटला आहे. याचा थेट परिणाम सोने-चांदी यांच्या किमतीवर होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने अमेरिकन डॉलर अधिक मजबूत झाला आहे. परिणामी ‘सेफ हेवन’ समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला असून, ५ मे २०२६ रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी डॉलरला पसंती दिल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,३२० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्यात १,२१० रुपयांची मोठी कपात झाली आहे. एमसीएक्सवर (शेअर बाजार) ५ जूनच्या वायद्यात सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही दोन दिवसांनंतर घसरण
सलग दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या भावात प्रति किलो ३२२ रुपयांची घट झाली आहे. यापूर्वी केवळ दोन दिवसांत चांदी तब्बल १५,००० रुपयांनी महागली होती. आज दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे चांदी २,६४,९०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये चांदीचा दर २,६९,९०० रुपये असून, चार महानगरांमध्ये चेन्नईत चांदी सर्वाधिक महाग आहे. तर एमसीएक्सवर (शेअर बाजार) ३ जुलैच्या वायद्यासाठी चांदीत घसरण पाहायला मिळत आहे.
इराण-अमेरिका संघर्षामुळे सोने घसरणार?
डॉलर आणि सोने हे दोन्ही व्यस्त प्रमाणात चालतात. म्हणजे जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोन्याची किंमत घसरते. याउलट डॉलर कमजोर झाल्यास सोन्याला उभारी मिळते. उभय देशांमध्ये शांतता चर्चा सुरू असतानाच सोमवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष पेटला. इराणने सामुद्रधूनीत येणाऱ्या अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला केला. तर अमेरिकेनेही इराणच्या बोट उडवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आता कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा भडका उडण्याची शक्यता आहे. जेव्हा कच्चे तेल महाग होते, तेव्हा देशांना अधिक डॉलरची गरज भासते. यातूनच डॉलरची मागणी वाढते. त्यामुळे सुरक्षित समजले जाणाऱ्या सोन्यापेक्षा डॉलर गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक वाटतात. परिणामी मौल्यवान धातूची चमक अशा वेळी फिकी पडते.
सोने पुन्हा भरारी घेणार?
वेल्थमिल्स सिक्युरिटीजचे रिसर्च डायरेक्टर क्रांती बाथिनी यांच्या मते, डॉलरची मजबुती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सोन्यावर दबाव आहे. अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता कमी असल्याने सोने सध्या ‘कन्सोलिडेशन फेज’मध्ये (स्थिरीकरण) आहे.
दुसरीकडे, गोल्डमॅन सॅक्सने अल्पकाळासाठी सोन्यात नरमाईचा अंदाज वर्तवला असला तरी, दीर्घकाळात मोठी तेजी अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी आणि अमेरिकेतील भविष्यातील व्याजदर कपातीमुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव १.६३ लाख रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
