पीटीआय, मुंबई
सरलेल्या एप्रिल-जून या तिमाहीत देशातील सोन्याची मागणी वार्षिक आधारावर ६ टक्क्यांनी घसरून १३१.४ टनांपर्यंत खाली आली आहे. सणोत्सवाच्या काळात घटलेली विक्री, वाढीव सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी कमी करण्याचे केलेले आवाहन यांमुळे ही घट झाली असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) गुरुवारी सांगितले.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या ‘क्यू२ २०२६ गोल्ड डिमांड ट्रेंड्स’ अहवालानुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण सोन्याची मागणी १३९.७ टन इतकी होती. तरीही, सोन्याच्या मूल्याच्या (किंमतीच्या) दृष्टीने हा एक विक्रम आहे. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील १,३२,५०० कोटी रुपयांच्या तुलनेत, सरलेल्या तिमाहीत विक्री झालेल्या सोन्याचे मूल्य १,९८,१०० कोटी रुपये होते. सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असूनही ग्राहक सोन्याच्या खरेदीलाच प्राधान्य देत असल्याचे डब्ल्यूजीसीचे भारतातील प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी सांगितले.
विद्यमान आर्थिक वर्षात सोन्याची मागणी ६५० ते ७५० टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र सध्याची भू-राजकीय परिस्थिती, व्याजदर आणि महागाई पाहता, मागणी या श्रेणीच्या (रेंजच्या) मधल्या टप्प्यावर राहण्याची शक्यता आहे. जर सोन्याच्या किमतीत आणखी घट झाली आणि सीमा शुल्कात कपात केली गेली, तर या श्रेणीच्या वरच्या टप्प्यापर्यंत मागणी पोहोचू शकतो, असेही जैन यांनी नमूद केले.
सरलेल्या तिमाहीत भारतातील दागिन्यांची एकूण मागणी १५ टक्क्यांनी घटून ७५.१ टन झाली; गेल्या वर्षी याच कालावधीत ती ८८.८ टन होती.
हंगामी काळात झालेली कमी मागणी, सोन्याची खरेदी कमी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन आणि सीमा शुल्कातील वाढ यांसारख्या घटकांचा मागणीवर परिणाम कायम आहे. खनिज तेलाच्या अस्थिर किमतींमुळे देशाचे आयात बिल वाढत असताना, परकीय चलन साठा वाचवण्यासाठी इतर मार्ग शोधावेत आणि सोन्याची अनावश्यक खरेदी कमी करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या वर्षी मे महिन्यात देशातील नागरिकंना केले होते.
सीमा शुल्क वाढल्याने तस्करी आणि बेकायदेशीर सोने खरेदीमध्ये वाढ होण्याची भीती वाढली आहे. हा या क्षेत्रासाठी सर्वात मोठा धोका आहे. आगामी तिमाहीत आम्ही यावर लक्ष ठेवू, असे जैन यांनी नमूद केले. दरम्यान, गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी उत्साहवर्धक राहिली; सोन्याचे बार आणि नाण्यांची मागणी वार्षिक आधारावर ९ टक्क्यांनी वाढून ५०.३ टनांवर पोहोचली, तर जागतिक स्तरावर सोन्यातून गुंतवणूक काढून घेण्याचा कल असूनही गोल्ड ईटीएफमध्ये ४.२ टनांचा निव्वळ ओघ दिसून आला. हे कल हे दर्शवतात की, सोने केवळ संपत्ती साठवण्याचे पारंपरिक साधन म्हणून नाही, तर वाढत्या अनिश्चित आर्थिक वातावरणात स्थिरता आणि गुंतवणुकीत विविधता देणारी एक धोरणात्मक गुंतवणूक म्हणूनही अधिक आकर्षक ठरत आहे.
डब्ल्यूजीसीच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून तिमाहीत भारतात पुनर्प्रक्रिया केलेल्या सोन्याचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटून १९.२ टनांवर आले; गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण २३.१ टन होते. देशात २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची एकूण आयात ९८.१ टन इतकी होती, जी २०२५ च्या याच कालावधीतील १२७.४ टनांच्या तुलनेत २३ टक्क्यांनी कमी आहे. दुसऱ्या तिमाहीत सोन्याची सरासरी किंमत प्रति औंस ४,५०६.३ अमेरिकी डॉलर इतकी होती, जी २०२५ च्या याच कालावधीत ३,२८०.४ डॉलर होती. तर भारतीय रुपयात, एप्रिल-जून दरम्यान सोन्याची सरासरी तिमाही किंमत १,५०,७४४.८ रुपये (आयात शुल्क आणि जीएसटी वगळून) इतके होते, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ते ९४,८७५.९ रुपये होते.
