Gold ETF FoF Investment Stopped: देशभरात दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या दरम्यान अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी त्यांच्या गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड फंड-ऑफ-फंड्समध्ये नवीन गुंतवणूक स्वीकारणे बंद केले आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, कोटक म्युच्युअल फंड, ॲक्सिस म्युच्युअल फंड आणि टाटा म्युच्युअल फंड यांनी १५ ऑक्टोबर रोजी याबाबत घोषणा केली. यानुसार, १६ ऑक्टोबरपासून त्यांच्या गोल्ड ईटीएफमधील नवीन एकरकमी गुंतवणूक, स्विच-इन आणि नवीन एसआयपी व एसटीपी नोंदणी तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ, डीएसपी आणि इन्व्हेस्को इंडिया यांनीही त्यांच्या वेबसाइटवर गोल्ड ईटीएफमधील नवीन गुंतवणूक स्वीकारणे बंद केल्याचे म्हटले आहे.
गोल्ड ईटीएफ एफओएफ ही एक म्युच्युअल फंड योजना आहे, ज्यद्वारे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करता येते. ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जशी डीमॅट खात्याची आवश्यकता असते, तशी गरज यात नसते. ही योजना म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देते.
दरम्यान, जे गुंतवणूकदार आधीपासूनच गोल्ड एफओएफमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करत आहेत, त्यांच्यावर याचा काहीही परिणीम होणार नाही. त्यांची एसआयपी सुरूच राहतील.
सध्याच्या अंदाजानुसार गोल्ड ईटीएफ उद्योगाचा एकूण आकार सुमारे १.७ लाख कोटी रुपये आहे, ज्यापैकी एक तृतीयांश मालमत्ता फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवलेली आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, भारतातील गोल्ड ईटीएफचा आकार पाहता, तो एकूण म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या सुमारे २% आहे. गोल्ड फंड ऑफ फंड्समधील गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय भारतातील सोन्याच्या मागणीवर फारसा मोठा परिणाम घडवून आणू शकणार नाही.
अलीकडच्या काळात, सरकारने सोन्याची आयात मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण या आयातीमुळे देशाच्या मौल्यवान परकीय चलन साठ्यावर ताण येतो. याच उद्देशाने, सरकारने सोन्यावरील आयात शुल्क पूर्वीच्या सुमारे ७-८ टक्क्यांवरून वाढवून १५% केले आहे.
